पतीला तुरुंगातून सोडवण्याचं आमिष, भावाच्या पत्नीकडेच शारीरिक सुखाची मागणी; घरातल्याच नराधमाचं संतापजनक कृत्य

छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल मध्यवर्ती कारागृहात असलेल्या पतीला जामिनावर बाहेर काढण्याचं आमिष दाखवून एका नराधम दिरानेच आपल्या वहिनीवर बळजबरीनं अत्याचार केल्याची संतापजनक घटना चिश्तिया कॉलनी परिसरात समोर आली आहे. पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून, ‘पोलिसांत तक्रार केली तर तुला जीवे मारीन’, अशी धमकी दिल्याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर खलील खान (रा. चमनपुरा, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे पती सध्या हर्सुल जेलमध्ये आहेत. याच हतबलतेचा गैरफायदा घेत आरोपी समीर खान याने १६ मे २०२६ ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत चिश्तिया कॉलनी परिसरातील राहत्या घरी पीडित महिलेशी वारंवार संपर्क साधला. ‘तुझ्या पतीला हर्सुल जेलमधून सोडवून आणतो, त्याबदल्यात मला शारीरिक सुख दे’, अशी मागणी आरोपीने वहिनीकडे सातत्याने लावून धरली होती. पीडित महिलेनं या अमानुष मागणीला ठाम नकार दिला. याचा प्रचंड राग धरून आरोपीने पीडितेला अश्लील शिवीगाळ करत हाताने बेदम मारहाण केली आणि तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या अत्याचारानंतर, ‘जर तू या प्रकाराबाबत कोणाकडे तोंड उघडलेस किंवा पोलिसांत तक्रार केलीस, तर तुला जीवे मारून टाकीन’, अशी धमकी देऊन आरोपी तेथून फरार झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *