लोणावळ्यातील भुशी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परवानाधारक 12 बोअर रायफलमधून गोळी झाडण्यात आल्यानं 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मृत तरुणाच्या 83 वर्षीय आजोबांसह एकूण पाच जणांविरोधात खुनासह पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
मृत्यूमागील नेमकं कारण काय?
मृत तरुणाचं नाव अभय माणिक मराठे, (वय 32) असं आहे. ही घटना काल सोमवारी रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास, भुशी गावाच्या हद्दीतील मोतीराम हॉटेलमध्ये घडल्याचं पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. पोलिसांच्या फिर्यादीनुसार, 83 वर्षीय मोतीराम रावजी मराठे यांच्याकडे परवानाधारक 12 बोअर रायफल होती. याच रायफलमधून गोळी झाडण्यात आली आणि त्यात त्यांचा नातू अभय मराठे याचा मृत्यू झाला. अभयच्या मृत्यूमागील नेमकं कारण काय होतं? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, पोलिसांच्या फिर्यादीत अज्ञात कारणावरून अभयचा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रकरण आणखी गंभीर वळणावर
या घटनेनंतर प्रकरण आणखी गंभीर वळणावर गेलं आहे. कारण, अभयच्या मृत्यूनंतर हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्याचे फुटेज असलेला डीव्हीआर काढून लपवून ठेवण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अभयचे चुलते हिरामण मोतीराम मराठे, चुलत भाऊ मनोज हिरामण मराठे, कविता हिरामण मराठे आणि राजश्री दशरथ पवार यांनी आपसात संगनमत करून गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
हॉटेलमधील सीसीटीव्ही यंत्रणा काढून लपवण्यात आल्यानं या घटनेचा महत्त्वाचा इलेक्ट्रॉनिक पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 238, 241, 3(5) तसेच आर्म्स अॅक्टच्या कलम 3 आणि 27(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
