‘दहशतवादाचे परिणाम भोगावे लागतील’, शाहबाज शरीफ यांच्या संयुक्त राष्ट्रांतील भाषणाला भारताचे सडेतोड प्रत्युत्तर

न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या महासेभत शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेल्या विधानांना भारताने शनिवारी चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या ‘प्रत्युत्तर देण्याच्या अधिकाराचा’ (right to reply) वापर करत, मुत्सद्दी पेटल गेहलोत यांनी शरीफ यांच्या विधानांना विचित्र म्हटले आणि आठवण करून दिली की, ९/११ च्या हल्ल्यांचा सूत्रधार ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानातच राहत असल्याचे आढळून आले होते.”अमेरिकेने नुकतीच ९/११ च्या हल्ल्यांची पुण्यतिथी पाळली. या हल्ल्यांचा सूत्रधार पाकिस्तानच्या लष्कराच्या प्रमुख अकादमीच्या अगदी शेजारी राहत होता,” असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

जागतिक संघटनेस संबोधित करताना काश्मीरचा मुद्दा पुन्हा उपस्थित करणाऱ्या शरीफ यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या व्यासपीठावरून, भारतासोबतच्या 2025 मधील संघर्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळेवर हस्तक्षेप केल्याचे सांगत त्यांना श्रेय दिले.

भारताने पाकिस्तानच्या दहशतवादाबाबतच्या दुतोंडी भूमिकेवर टीका करताना म्हटले की, पाकिस्तान दिवसा सुरक्षेचा दावा करतो आणि रात्री दहशतवाद पसरवतो. दहशतवादाचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत भारताने स्पष्ट केले की, स्वतःच्या संरक्षणासाठी भारत पावले उचलेल. “दहशतवाद्यांना पळून जाण्यासाठी किंवा लपण्यासाठी कोठेही जागा उरणार नाही, हे आम्ही गेल्या वर्षीच दाखवून दिले आहे. दहशतवादाविरुद्ध स्वतःच्या संरक्षणाचा अधिकार आम्ही नक्कीच बजावू. तसेच, पाकिस्तानकडून सुरू असलेल्या दहशतवादाचे परिणाम त्यांना भोगावे लागतील,” असे भारताने म्हटले.

22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात 26 नागरिक मारले गेले होते. याच्या प्रत्युत्तरात भारताने गेल्या वर्षी 7 मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपण मध्यस्थी करत भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध रोखले होते असे दावे केले होते. मात्र भारताने हे दावे वारंवार फेटाळून लावले आहेत.

भारताने संयुक्त राष्ट्र महासभेला आवाहन केले की, “पाकिस्तान आणि त्याच्या धोरणांकडे त्यांचे खरे स्वरूप ओळखून पहावे, केवळ त्यांचे प्रतिनिधी ज्या खोट्या पद्धतीने ते सादर करतात त्यावरून नाही. वर्षानुवर्षे असत्य गोष्टींचा पुनरुच्चार केल्याने ते सत्य ठरत नाही. पाकिस्तानचा दुटप्पीपणा आणि कपट यांचा फायदा ना त्याला होणार आहे, ना जगाला होणार आहे”

आपल्या सुमारे 23 मिनिटांच्या भाषणात शरीफ यांनी काश्मीरचा मुद्दाही उपस्थित केला. दक्षिण आशिया पुन्हा कधीही 2025 मधील संघर्षाच्या त्या गंभीर वळणावर पोहोचू नये यासाठी काश्मीर प्रश्नावर न्याय्य आणि निष्पक्ष तोडगा काढणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. जम्मू-काश्मीर हा “भारताचा अविभाज्य आणि अतूट भाग” असल्याचे सांगत गेहलोत यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील मानवाधिकारांच्या उल्लंघनाकडे लक्ष वेधले.

“आपण पाकव्याप्त काश्मीरकडे (PoK) वळूया. तेथील पाकिस्तान सरकारकडून होणाऱ्या अनियंत्रित हत्या आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबत रावलकोटमधील लोकांना विचारा,” असे त्या म्हणाल्या. “पाकिस्तानची राजवट ही लष्कराची, लष्करासाठी आणि लष्कराद्वारे चालवली जाणारी आहे. त्यांची बाहुली (सत्ताधारी) बदलू शकते, पण खरी सूत्रे मात्र लष्कराच्याच हातात असतात,” असंही भारताने म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *