तेलंगणामधील वारंगल येथे काँग्रेसचे माजी खासदार सिरसिला राजय्या यांच्या घराला बुधवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत पहिल्या मजल्यावर असलेल्या राजय्या यांची सून एस. सारिका आणि त्यांचे तीन नातू या चौघांचा होरपळून मृत्यू झाला.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. आग लागण्याचे कारण शोधण्यात येत आहे.
सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ नोव्हेंबरला होणारी लोकसभा पोटनिवडणूक राजय्या लढवत आहेत. राजय्या यांची सून सारिका हिने आपल्या सासरकडून छळ होत असल्याची तक्रार एप्रिल २०१४ मध्ये बेगमपेट महिला पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीत तिने आपले सासरे, सासू, नवरा आणि अन्य एक महिला छळ करत असल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे ही आग लागली की कोणी लावण्यात आली, यामागचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत.
राजय्या हे २००९ ते २०१४ या कालावधीत वारंगल येथून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र, गेल्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.