गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान भिंगार येथे झालेल्या लाठीमारानंतर दीपक वाघस्कर यांच्या मृत्यूनं शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेवरून पोलिसांवर गंभीर आरोप होत असतानाच पोलीस अधीक्षकांनी पत्रकारांशी बोलताना संपूर्ण घटनाक्रमाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्या ठिकाणी पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला, त्या ठिकाणी दीपक वाघस्कर उपस्थित नसल्याचा दावा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केला आहे.
पोलीस अधीक्षकांची मोठी माहिती
पोलीस अधीक्षकांच्या माहितीनुसार, विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरला लावलेली ट्रॉली हलत होती. या ट्रॉलीवर काही मुले असल्यानं त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना खाली उतरवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या पायावर सौम्य लाठीमार केला. मात्र, या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. याच लाठीमारात दीपक वाघस्कर यांच्यावर मारहाण झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, दीपक वाघस्कर यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोस्टमार्टम अहवालानंतर मृत्यूचं कारण समोर येणार असून, त्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असंही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
