नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. आहे. तेलंगणामध्ये राहणारी युवती कॉलेजला गणपती काळात सुट्ट्या लागल्यामुळे आपल्या मूळ गावी परत आली होती. त्यानंतर संशयास्पद परिस्थितीत तिची बॉडी आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा असल्याने गूढ वाढलं आहे. वडिलांच्या निधनानंतर आईने तिला आणि तिच्या बहिणीला वाढवलं. यया घटनेने तिच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आईने शेजारी तरुणावर संशय व्यक्त केला आहे.
मृत तरुणीचे नाव हरिणी असं होते. ती तेलंगणाच्या भद्राद्री कोठागुडम जिल्ह्यातील रहिवासी होती. खम्ममजवळील एका खाजगी महाविद्यालयात हरिणी नर्सिंगचे शिक्षण घेत होती. ही घटना घडली तेव्हा ती वेंगान्नापालेम गावातील आपल्या घरी होती.
आई नातेवाईकाकडे गेली असताना लेकीचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिणीची आई राजेश्वरी वेंगान्नापालेम गावातील एका नातेवाईकाच्या घरी गेल्या होत्या. परत आल्यावर त्यांना आपली मुलगी घरात नसल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी तिचा शोध सुरू केला. शोध घेत असताना हरिणीचं शव घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरुमच्या मागे आढळलं. तिच्या शरीरावर अनेक जखमा दिसून आल्या.
शेजाऱ्यावर संशय व्यक्त
शरीरावरील या जखमांमुळे तिच्या मृत्यूच्या कारणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हरिणीच्या आईने शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीबद्दल संशय व्यक्त केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
मात्र पोलिसांना अद्याप कोणत्याही व्यक्तीचा यात सहभाग असल्याचे आढळलेले नाही; हरिणीच्या मृत्यूचे नेमके कारण आणि त्यामागची परिस्थिती याचा तपास सुरू आहे.
वडिलांचे निधन, आईने दोन लेकींना सांभाळलं
हरिणीच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर आपल्या दोन मुलींचा उदरनिर्वाह आणि शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी तिची आई रोजंदारीवर काम करत होती.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच, घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी ‘क्लूज टीम’लाही पाचारण करण्यात आले.
