वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी गावात सलग दोन रात्री आकाशात ड्रोनच्या फेऱ्या दिसल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. कोठारी गावात सलग दोन रात्री आकाशात ड्रोन दिसल्याची बाब स्थानिक पातळीवर चर्चा आणि चिंतेचा विषय ठरली आहे. अशा घटना महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये विशेषतः अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर परिसरात यापूर्वीही घडल्या आहेत.
रेकीसाठी उडवले जात आहेत ड्रोन?
सोमवारपासून रात्री गावावर आकाशात चमकणारे दिवे किंवा ड्रोनसारखी वस्तू दिसते. हा ड्रोन असल्याचं बहुतांश लोकांचं म्हणणं आहे. ग्रामस्थ घाबरलेले असून चोरी किंवा मोठ्या दरोड्यासाठी रेकी केली जात असल्याची भीती व्यक्त करत आहेत. मागील दोन रात्रींपासून या गावातील अनेकजण जागेच राहत असून काहीजण रात्रभर पहारा देत आहेत. या गावावर ड्रोनच्या माध्यमातून कोणाची नजर आहे? कोण आणि कशासाठी या गावावर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवून आहे? हे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत.
कधी कधी इथं दिसलेत ड्रोन?
परवा रात्री 11 ते 11.30 आणि काल रात्री 9.30 ते 10 वाजेदरम्यान ड्रोनने दोन ते तीन फेऱ्या मारल्याचे नागरिकांनी सांगितले. सलग दोन दिवस ड्रोन दिसल्याने गावात चर्चांना उधाण आले असून, अनेक नागरिक घराबाहेर पडून चौकाचौकात जमा झाले. हा ड्रोन नेमका कुणाचा आणि गावावरून तो का फिरत होता, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकतेसोबतच चिंता निर्माण झाली आहे.
यापूर्वीच्या अशा घटनांमध्ये काय खुलासे झालेत?
मागील अशा घटनांमध्ये बहुतेक वेळा, सरकारी किंवा खासगी सर्वेक्षण ड्रोन (नदी सर्वे, जमीन सर्वे, कृषी ड्रोन इत्यादींसाठी वापरले जाणारे) किंवा परवानगीशिवाय उडवलेले ड्रोन तर काही प्रकरणांत फक्त उडणारे खेळण्यांसारखे म्हणजेच फ्लाइंग टॉय असल्याचं आढळून आलं आहे.
