उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. शंभुपूर गावात एका व्यक्तीने आपल्या पत्नीसह दोन पुजाऱ्यांची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले असून त्याने स्वतःला मुलांसह घरात डांबून ठेवले होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. इतकंच नव्हे तर मुलांना वाचवताना पोलिसांनी गोळीबार केला यात आरोपी अरविंद याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा आठ वर्षांचा मुलगादेखील जखमी झाला होता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असून नेमकं काय घडलं आणि अरविंदच्या घरात कसली पूजा सुरू होती. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. अरविंदची आई श्यामबाला देवी यांनी या सगळ्या घटनाक्रमाची माहिती दिली आहे. अरविंदसाठी त्याची पत्नी बबीता तीन पुजाऱ्यांसह घरात गेल्या तीन दिवसांपासून महामृत्यूंजय जाप करत होती. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जेव्हा अरविंद घरी गेला तेव्हा त्याने पुजाऱ्यांकडून आधार कार्ड मागण्यास सुरुवात केली.
