बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर जाणवत आहे. गेल्या काही काळापासून गायब झालेला पाऊस आता जोरदार बरसत आहे. मराठवाडा, विदर्भासह राज्यातील काही भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. तरीही अद्याप संपूर्ण राज्यात सर्वदूर पाऊस झालेला नाही. अशातच पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाची स्थिती कायम काय राहील का? याबाबत हवामान विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे.
कोकणात पावसाचा यलो अलर्ट
23 सप्टेंबर रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे आणि मुंबई परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. काही ठिकाणी 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही सांगितला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव येथे हलक्या ते मध्यम पावसासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. नाशिक आणि घाटमाथा परिसरातही पावसाच्या सरींसह 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागातील हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.
