शारीरिक शोषण केल्यानंतर लग्नास नकार दिल्याने प्रियकराला व्हीडिओ कॉल करीत प्रेयसीने आत्महत्या केली. प्रेयसीने आत्महत्या केल्यानंतर तब्बल २३ मिनिटे हा कॉल सुरू होता. ही धक्कादायक घटना धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.
याप्रकरणी पोलिसांनी प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. सचिन डहाट (वय ३४) रा. शिवाजीनगर, अमरावती असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. अंजली (बदलेले नाव) असे मृताचे नाव आहे. तो सध्या पुण्यात राहात असून सावित्रीबाई फुले विद्यापीठात पीएचडी करीत आहे.
डिसेंबर २०२५पासून अंजली नागपुरातील एका कंपनीत काम करायची. ती धंतोलीत मैत्रिणीसोबत राहायची. प्राप्त माहितीनुसार, सचिन व अंजलीचे २०१५पासून प्रेमसंबंधआहेत. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. लग्नाचे आमिष दाखवून सचिनने अंजलीचे शारीरिक शोषण केले. काही दिवसांपूर्वी तो मित्रासह अंजलीच्या आईला भेटायला गेला. अंजलीशी लग्न करणार असल्याचे त्याने तिच्या आईला सांगितले. तिच्या आईने होकार दिला. सचिनने आई व भावाला माहिती दिली. त्यांनी मात्र लग्नास नकार दिला. सचिनने याबाबत गुप्तता बळगली. तो नागपुरात येऊन अंजलीला भेटायला लागला. तिचे शोषण करायला लागला.
लग्नाचा तगादा लावल्यास आक्षेपार्ह छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी त्याने अंजलीला दिली. याचा अंजलीच्या मनावर परिणाम झाला. १९ सप्टेंबरला रात्री अंजलीने पंख्याला ओढणी बांधली. त्यानंतर तिने सचिनला व्हीडिओ कॉल केला. तिने आत्महत्या करीत असल्याचे त्याला सांगितले. सचिन याने तिला मनाई केली नाही. अंजलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने आत्महत्या केल्यानंतरही व्हीडिओ कॉल २३ मिनिटे सुरूच होता, असे अंजलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
मोबाइल ब्लॉक केला, प्रियकराने जीव दिला
नागपूर : प्रेयसीने मोबाइल क्रमांक ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने गळफास घेऊन जीवन संपविले. ही हृयद्रावक घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. प्रेम (वय २३) असे मृताचे नाव आहे. तो रेल्वेतील पेन्ट्रीकारमध्ये काम करायचा.
