नाशिकमधील प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनिषा जेजुरकर यांच्या मृत्यू प्रकरणात पती डॉ. नीलेश जेजुरकर यांच्यासोबत प्रेमसंबंध असलेल्या डॉ. स्वाती चव्हाणला सोमवारी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून ही कोठडी आज संपत आहे. ती वाढवून घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात कामाला असलेल्या नीलेश आणि स्वातीचे प्रेमसंबंध असल्याचं मनिषा यांना समजलं होतं. दोन मुली असलेल्या मनिषा यांनी याच तणावातून 6 मार्च 2026 रोजी नाशिकच्या गंगापूर रोडवरील डीके नगर येथील राहत्या फ्लॅटमध्ये 40 वर्षीय मनीषा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मनीषा यांची बहीण रोहिणी थोरात यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये मनीषा यांचा पतीकडून छळ केला जात होता. यामागे अनैतिक संबंधांचं प्रकरण असल्याचा आरोप रोहिणी यांनी केला. याच पार्श्वभूमीवर सहा महिन्यांनंतर अटकसत्राला सुरुवात झाली असून अगदी सर्वोच्च न्यायालयानेही जमीन फेटाळल्यानंतर शनिवारी नीलेश तर रविवारी स्वातीला अटक करण्यात आली. न्यायालयामध्ये मंगळवारी होत असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्वातीच्या वकिलानेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नीलेश आणि स्वाती यांच्या प्रेमसंबंधाचा संदर्भ दिला.
प्रेमाच्या कबुलीनंतर दोघांनाही अटक
शनिवारी अटक करण्यात आलेल्या नीलेशने स्वातीसोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. त्यानंतर स्वातीलाही अटक करण्यात आली. दरम्यान चौकशीदरम्यान डॉक्टर स्वातीने, मृत मनीषाला “तुझ्या नवऱ्याला तू आवडत नाही, तुझं शिक्षण चांगलं नाहीये”, असं म्हटल्याचं कबुल केलं आहे. जेजुरकर-चव्हाणच्या प्रेमसंबंधाच्या कबुलीनंतर पोलीस तपासाला वेग आला. त्यामुळेच आज (मंगळवार, 22 सप्टेंबर रोजी) पोलीस कोठडी संपणार असल्यानं निलेशसह स्वातीला न्यायालयात एकत्रित हजर करण्यात येणार आहे. या पूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोपीच्या वकिलांनी दोघांमध्ये प्रेमसंबंध होते असं मान्य केलं तरी त्यांनी डॉ. मनिषा जेजुरकरांना काय त्रास दिला याचा वेगळा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज काय आहे? असा सवाल उपस्थित केला.
आरोपीचे वकील नक्की काय म्हणाले?
आरोपीचे वकील अविनाश भिडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, “आत्तापर्यंत 9 वेळा तपासासाठी डॉ. चव्हाण उपस्थित होत्या. स्टेटमेंट दिले होते, फोटो घेतले होते. पोलीस कस्टडी घेऊन काय तपास करणार आहे. एक वेळ मान्य करा दोन्ही आरोपींमध्ये प्रेमसंबंध होते. मग मृत व्यक्तीला काय त्रास दिला किंवा अन्य काय केलं याचा आता वेगळा काय तपास करणार. पोलीस कस्टडी देऊ नका. आमची न्यायालयीन कोठडीची मागणी होती,” असं सांगितलं.
