पुण्यातील प्रसिद्ध यु-ट्युबर संतोष पंडित यांचा जामीन मंजूर, तुरुंगातून बाहेर येताच पंडितांची डरकाळी; काय म्हणाले?

उच्च आणि तंत्रशिक्षण तथा भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अटकेत असलेले पुण्याचे प्रसिद्ध युट्युबर संतोष पंडित यांना अखेर कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयानं 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर पंडित यांचा जामीन मंजूर केला असून, आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली. जामीन देताना न्यायालयानं संतोष पंडित यांच्यावर कडक निर्बंध लादले आहेत. खटल्याशी संबंधित पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करू नये आणि तक्रारदाराशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये, असं स्पष्ट आदेश कोर्टाने दिले आहेत.

संतोष पंडित यांची स्पष्ट भूमिका

कारागृहाबाहेर पडल्यानंतर संतोष पंडित यांनी आपली भूमिका मांडली आहे. ‘माझ्यावर झालेली ही कारवाई अनपेक्षित आणि धक्कादायक होती. पण माझा देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. संविधानाने मला मत मांडण्याचा जो मूलभूत अधिकार दिला आहे, तोच मी वापरत आलो आहे आणि पुढेही वापरत राहीन,’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘लोकशाहीत नागरिकच सर्वोच्च असतात, त्यामुळे सत्तेत बसलेल्यांना प्रश्न विचारणे हा लोकांचा अधिकार आहे. मी कोणावरही वैयक्तिक पातळीवर द्वेषातून टीका केलेली नाही. सत्ताधारी कोणाचेही असोत, लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचं काम मी थांबवणार नाही’, असं पंडित यांनी स्पष्ट म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *