पुण्यात अग्निसुरक्षेचा धडाका; रुग्णालये, पीजी, क्लासेसच्या फायर ऑडिटचा आयुक्तांचा आदेश; प्रशासन सज्ज

देशभरातील विविध दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता अग्निसुरक्षेचा धडाका सुरू केला आहे. शहरातील खासगी, सरकारी; तसेच महापालिका रुग्णालयांसह ‘पीजी’ होस्टेल आणि क्लासेसचा फायर ऑडिट करण्याचा आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिला आहे. या तपासणीचा अहवाल दहा दिवसांत सादर करण्याचा आदेशही अग्निशमन विभागाला देण्यात आला आहे. आयुक्त राम यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांना या संदर्भात सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ करण्यात येणार आहे.

‘या’ बाबींची तपासणी

रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी असते. त्यामुळे आगीसारखी दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमधील अग्निसुरक्षेची यंत्रणा, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग आदी बाबींची तपासणी करण्यात येणार आहे.

अग्निसुरक्षेचा स्वतंत्रपणे आढावा घेतला जाणार

रुग्णालयांमधील माता आणि बालकांवरील उपचार कक्षांची प्रामुख्याने तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विभागांमध्ये उपचार घेणारे रुग्ण; तसेच नवजात आणि लहान बालके असल्याने आपत्कालीन परिस्थितीत त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणे आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे या विभागांच्या अग्निसुरक्षेचा स्वतंत्रपणे आढावा घेतला जाणार आहे.

‘पीजी होस्टेल’ आणि क्लासेसचीही तपासणी

दिल्लीतील क्लासमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील सर्व ‘पीजी होस्टेल’ आणि क्लासेसचीही तपासणी करण्यात येणार आहे. विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र येत असलेल्या या ठिकाणी अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन होते, की नाही याची पाहणी केली जाणार आहे. दहा दिवसांत अहवाल सादर करण्याच्या आदेशामुळे अग्निशमन विभागासमोर आता शहरातील विविध आस्थापनांचे ‘फायर ऑडिट’ वेगाने पूर्ण करण्याचे आव्हान आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर पुढील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *