कळवा रुग्णालयातील कँटीन बंद, जेवणात झुरळ आढळल्यानंतर FDAची कारवाई

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळआढळल्याच्या प्रकारानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली आहे. रुग्णांना जेवणाचा पुरवठा करणाऱ्या ‘राम कॅटरर्स’चे कँटीन तातडीने बंद करण्यात आले असून, एफडीएची तपासणी पूर्ण होऊन अधिकृत परवानगी मिळेपर्यंत ते सुरू होणार नाही, अशी माहिती रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांनी दिली.

कळवा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक सहामध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या रुग्णाच्या जेवणाच्या ताटात २८ ऑगस्ट रोजी झुरळ आढळले होते. या प्रकारानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा मुद्दा उपस्थित करत अधिष्ठाता कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी कारवाई करून त्याला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी मनसेचे जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केली होती.

या घटनेची दखल घेत एफडीएने संबंधित स्वयंपाकघराची तपासणी केली. तपासणीत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने कॅन्टीनचे कामकाज तातडीने थांबवण्यात आले. दरम्यान, संबंधित केटरर्सचा ठेका दोन महिन्यांपूर्वीच संपुष्टात आला होता. मात्र, मुदतवाढीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने त्यांच्याकडून रुग्णालयात अन्नपुरवठा सुरू होता, अशी माहिती डॉ. कदम यांनी दिली.

कँटीन बंद झाल्याने रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी रुग्णालय प्रशासनाने तात्पुरती पर्यायी व्यवस्था केली आहे. रुग्णांना वेळेवर, सुरक्षित, पौष्टिक आणि स्वच्छ अन्न मिळावे, यासाठी दुसऱ्या ठिकाणाहून भोजन पुरवठा करण्यात येत आहे. कँटीनचा प्रश्न निकाली निघेपर्यंत ही पर्यायी यंत्रणा सुरू राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *