उत्तर गोव्यातील सिओलिम येथील राई गावात एका भाड्याच्या घरात राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तो मूळचा पुण्यातील रहिवासी होता. रोहित जळगावकर असे मयत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी मैत्रिणीसोबत झालेल्या वादादरम्यान त्याने स्वतःवरच चाकूने वार केल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे.
मैत्रिणीशी वाद
मूळ पुण्याचा रहिवासी असलेला रोहित जळगावकर भाड्याने राहत असलेल्या सिओलिम येथील घरातूनच वर्क फ्रॉम होम करत होता. हैदराबाद येथे वास्तव्यास असलेल्या आणि तिथूनच काम करणाऱ्या मैत्रिणीसोबत त्याचे भांडण झाले होते. अंजुना पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला तिच्या कॉम्प्युटरवर काम करत असताना हा वाद विकोपाला गेला.
वादादरम्यान रोहितने स्वयंपाकघरातील चाकू उचलला आणि स्वतःच्याच पोटात वार करुन घेतले. मात्र त्यानंतर मदतीसाठी त्याने दिलेल्या हाकाआरोळ्या ऐकून घरमालक आणि परिसरातील रहिवाशांचे याकडे लक्ष वेधले गेले आणि ते तातडीने घटनास्थळी धावून आले.
रुग्णालयात जाईपर्यंत उशीर
रोहितला तातडीने सिओलिम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, परंतु वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. रुग्णालयात पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर, पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळाचा पंचनामा केला.
रोहितची मैत्रीण ताब्यात
मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी रोहितचं शव बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तपासाचा एक भाग म्हणून, घडलेल्या घटनेबाबत माहिती घेण्यासाठी पोलिसांनी रोहितच्या मैत्रिणीला ताब्यात घेतले आहे.
अंजुना पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची अधिकृत नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्या देखरेखीखाली सध्या तपास सुरु असून, या दुर्दैवी घटनेशी संबंधित सर्व परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी ते पुरावे गोळा करणे आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवणे यांसारख्या बाबींवर लक्ष ठेवून आहेत.
पत्नीची हत्या करून जीव दिला
पत्नीची हत्या करून तरुणाने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा परिसरात शुक्रवारी घडली. मजुरीकाम करणाऱ्या २० वर्षांच्या एहसान शेख याने पत्नी जन्नत हिची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर तोच चाकू त्याने स्वतःच्या गळ्यावर मारून घेतला.
यामागील नेमके कारण समजू शकले नसले तरी त्याने घरगुती वादातून हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एहसान आणि जन्नत हे दोघेही मजुरीकाम करत. आग्रीपाडा येथील कालापाणी चौकी परिसरात हे दाम्पत्य वास्तव्यास होते. त्यांच्यामध्ये घरगुती कारणावरून वारंवार खटके उडायचे, असे समजते.
