जळगावच्या पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथील रहिवासी आणि भारतीय सैन्य दलातील 1 पॅरा स्पेशल फोर्सचे पॅरा कमांडो जवान रोहित नारायण पाटील (काटे) यांना कर्तव्य बजावताना वीरमरण प्राप्त झाले. देशसेवेत तब्बल नऊ वर्षे समर्पित सेवा बजावणाऱ्या या वीर जवानाचे पार्थिव शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. आपल्या लाडक्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी कोळपिंप्रीसह पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने नागरिकांचा जनसागर उसळला होता. रात्री आठ वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हरियाणा राज्यातील यमुनानगर येथील हथिनीकुंड बॅरेज येथे लष्कराच्या पूर-बचाव प्रशिक्षणादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. प्रशिक्षण सुरू असताना मोटरबोटीच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने बोट उलटली. या दुर्घटनेत जवान रोहित काटे यांना वीरमरण आले. गुरुवारी त्यांच्या निधनाची वार्ता कोळपिंप्री गावात पोहोचताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले.
300 फूट तिरंग्यासह निघाली वीर जवानाची अंत्ययात्रा
सायंकाळी साडेपाच वाजता रोहित काटे यांचे पार्थिव कोळपिंप्री गावात दाखल झाले. पार्थिवाचे दर्शन होताच कुटुंबीयांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. गावकऱ्यांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात आपल्या वीर सुपुत्राचे स्वागत केले. तब्बल ३०० फूट लांबीचा तिरंगा फडकावत, देशभक्तीपर गीतांच्या निनादात त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. गावातील प्रत्येक गल्लीमध्ये नागरिकांनी रांगोळ्या काढून वीर जवानाला आदरांजली वाहिली होती. ‘वीर जवान अमर रहे!’, ‘रोहित काटे अमर रहे!’, ‘भारत माता की जय!’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
शासकीय इतमामात लष्करी मानवंदना
अंत्यसंस्कारस्थळी भारतीय सैन्य दलातील जवानांनी शासकीय इतमामात रोहित काटे यांना मानवंदना दिली. लष्करी जवानांच्या शिस्तबद्ध सलामीने उपस्थितांचे मन हेलावून गेले. विविध मान्यवर, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, माजी सैनिक, ग्रामस्थ आणि नागरिकांनी पुष्प अर्पण करून वीर जवानाला श्रद्धांजली वाहिली.
