दहीहंडी आटोपल्यानंतर आक्रित घडलं, लोखंडी कमान काढताना रॉड पडून पुण्यात महिलेचा करुण अंत, गुन्हा दाखल करण्यास नकार; कारण काय?

पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात दहीहंडी उत्सव साजरा होत असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हळहळ व्यक्त करणारी घटना समोर आली आहे. दहीहंडी उत्सवासाठी उभारण्यात आलेली लोखंडी कमान काढत असताना त्याचा लोखंडी भाग महिलेच्या अंगावर पडल्यानं तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सलमा सलाउद्दीन पठाण, (वय 45), असं मृत महिलेचं नाव आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या सांगवी परिसरात रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विघ्नहर्ता मंडळाची दहीहंडी उत्साहात पार पडली. उत्सव संपल्यानंतर मंडप आणि लोखंडी सांगाडा काढण्याचं काम सुरू होतं. याचवेळी सलमा पठाण या आपल्या पतीसोबत घटनास्थळी उभ्या होत्या. लोखंडी सांगाडा काढण्याचं काम सुरू असतानाच अचानक लोखंडी भाग त्यांच्या डोक्यावर कोसळला. या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या.

मृत महिलेचा मुलगा दहीहंडी मंडळात

घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेनं जुन्या सांगवी परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि चौकशी केली. चौकशीदरम्यान मृत महिलेचा मुलगा याच दहीहंडी मंडळात असल्याचं समोर आलं. दरम्यान, या प्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मंडळातील इतर मुलं अडचणीत येऊ नयेत, तसेच मृत महिलेचा मुलगाही याच मंडळाशी संबंधित असल्याने, कुटुंबीयांनी मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार दिल्याची माहिती आहे.

दुर्घटनेमुळे उत्सवाला गालबोट

तसंच, पोलिसांनीही स्वतःहून गुन्हा दाखल करू नये, अशी विनंती मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केल्याचं सांगण्यात येत आहे. दहीहंडीचा उत्सव आनंदात साजरा होत असताना घडलेल्या या दुर्घटनेमुळे मात्र उत्सवाला गालबोट लागलं आहे. एका कुटुंबाने आपली आई आणि पत्नी गमावली आहे. उत्सव संपल्यानंतर काही क्षणांतच आनंदाचं वातावरण दुःखात बदललं आणि जुन्या सांगवीवर शोककळा पसरली. उत्सवाच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या लोखंडी कमानी, सांगाडे आणि इतर संरचना काढताना योग्य ती खबरदारी घेतली जातेय का, सुरक्षेचे नियम पाळले जात आहेत का, असा प्रश्नही या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *