शर्वरीला फोन करायला सांग, भावाला शाळेत गाठलं, कॉल येताच लोकेशन मिळवलं, एकतर्फी प्रेमाचा जहरी शेवट, कुटुंब स्मशानातून थेट पोलिसात

बियाणी सायन्स कॉलेजची १८ वर्षीय विद्यार्थिनी शर्वरी हाडके हिच्या निर्घृण हत्याकांडाने अमरावती सुन्न झाले आहे. या प्रकरणातील आरोपी आनंद भड (वय २१), रा. रोही, माना (मूर्तिजापूर) याला राजापेठ पोलिस व गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री गोंदिया येथून बेड्या ठोकल्या. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

भावाच्या शाळेत जाऊन चौकशी

गुरुवारी हत्येपूर्वी आरोपी आनंद आणि त्याचे दोन साथीदार शर्वरीचा भाऊ शिकत असलेल्या सामरा शाळेत गेले होते. त्यांनी तिच्या भावाला भेटून शर्वरीला फोन करण्यास सांगत तिचे थेट लोकेशन मिळवले. त्यानंतर आनंदने रविनगर परिसरात दबा धरून शर्वरीची निर्घृण हत्या केली. हा संपूर्ण प्रकार शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या गुन्ह्यात आनंदला त्याच्या साथीदारांनी मदत केल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिस त्या दिशेने कसून तपास करत आहेत. आनंदला गोंदियापर्यंत पळून जाण्यास कोणी मदत केली याचा शोध घेतला जात आहे.

नातेवाईक स्मशानातून पोलीस ठाण्यात

शोकाकूल वातावरणात शर्वरीवर शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार पार पडले. त्यानंतर संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी थेट राजापेठ पोलिस ठाण्यावर धडक दिली. पोलिस आयुक्त राकेश ओला यांना निवेदन देऊन आरोपींना कठोर शिक्षेची मागणी करण्यात आली. यावेळी संतप्त जमावाने पोलिस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. तर नेत्यांनी आरोप करीत रोष व्यक्त केला.

चाकूचे वार करुन आरोपी पसार

अंबाविहार परिसरात राहणारी शर्वरी गुरुवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास दुचाकीने कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. रविनगर येथील नाल्याच्या पुलाजवळ आधीच दबा धरुन बसलेल्या आनंदने तिला अडवलं. दोघांमध्ये काही मिनिटं भांडणं झाली. त्यानंतर संतापलेल्या आनंदने सोबत आणलेल्या बॅगमधून भाजी कापायचा चाकू काढला आणि शर्वरीवर सपासप वार केल्याचा आरोप आहे. शर्वरी रक्ताच्या थारोळ्यात पडली असतानाच स्थानिक नागरिक आणि वाटसरुंनी आनंदला घेरण्याचा प्रयत्न केला; मात्र तो दुचाकीवरून पसार होण्यात यशस्वी ठरला होता.

दोन वर्षांची ओळख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्वरी आणि आनंद हे दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. मूळचा मूर्तिजापूरचा असलेला आनंद बीकॉम पूर्ण केल्यानंतर अमरावतीच्या गोपालनगर भागात भाड्याने राहून एसी दुरुस्तीचे काम करत होता.

रागातून टोकाचं पाऊल

काही दिवसांपासून शर्वरीने आनंदशी बोलणे बंद केले होते. त्याचा फोन उचलणेही ती टाळत होती. याच रागातून आनंदने हा टोकाचा मार्ग निवडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घरातून भाजी कापायचा चाकू बॅगमध्ये घेऊन तो अमरावतीत आल्यामुळे ही हत्या पूर्वनियोजित असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *