अमरावतीच्या बियाणी सायन्स कॉलेजमध्ये बीएससीच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या १८ वर्षीय शर्वरी गणेश हाडके हिची एका माथेफिरू तरुणाने भर रस्त्यात चाकूने सपासप वार करून हत्या केली. एकतर्फी प्रेमातून शर्वरीला अडवून तिच्या गळा आणि पोटावर तब्बल आठ वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शर्वरीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आनंद भड (वय २१, रा. रोही माना, मूर्तिजापूर) असे संशयित आरोपीचे नाव असून, घटनेनंतर तो पसार झाला आहे. शहर हादरवून सोडणारी ही संतापजनक घटना गुरुवारी दुपारी गजबजलेल्या रविनगर परिसरात घडली.
चाकूचे वार करुन आरोपी पसार
अंबाविहार परिसरात राहणारी शर्वरी दुपारी १२.४५ च्या सुमारास दुचाकीने कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. रविनगर येथील नाल्याच्या पुलाजवळ आधीच दबा धरून बसलेल्या आनंदने तिची दुचाकी अडवली. दोघांमध्ये काही मिनिटे वाद झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या आनंदने सोबत आणलेल्या बॅगमधून भाजी कापायचा चाकू काढून शर्वरीवर सपासप वार केले. शर्वरी रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच स्थानिक नागरिक आणि वाटसरूंनी त्याला घेरण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपी दुचाकीवरून पसार होण्यात यशस्वी ठरला.
दोन वर्षांची ओळख
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शर्वरी आणि आनंद गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. मूळचा मूर्तिजापूरचा असलेला आनंद बीकॉम पूर्ण केल्यानंतर अमरावतीच्या गोपालनगरमध्ये भाड्याने राहून एसी दुरुस्तीचे काम करत होता.
रागातून टोकाचा मार्ग
काही दिवसांपासून शर्वरीने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. त्याचा फोन उचलणेही टाळले होते. या रागातूनच आनंदने हा टोकाचा मार्ग निवडल्याचा अंदाज आहे. घरातून भाजी कापायचा चाकू बॅगमध्ये घेऊन अमरावतीत आल्यामुळे ही हत्या पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे स्पष्ट होते. सध्या राजापेठ व स्थानिक गुन्हे शाखेची पथके आरोपीच्या शोध घेत आहेत.
