दिवाळी म्हटली की फराळाने भरलेले ताट अगदी काही क्षणांत डोळ्यासमोर येते. त्यातील कुरकुरीत चकली, खुसखुशीत शंकरपाळी, लज्जतदार करंजी, चवदार चिवडा आणि अनारसे पाहून तोंडाला पाणी सुटते.
मात्र, आवडीने खाल्ले जाणारे हे अनेक लज्जतदार पदार्थ नेमके बनवायचे कसे याबद्दल अनेकांना प्रश्नचिन्ह असतो. त्यामुळे अनेक गृहिणी पुस्तकांतील पाककृतींचा उपयोग करतात, परिणामी या काळात या पुस्तकांना चांगली मागणी असते. मात्र, यावर्षी फराळांच्या पाककृती सांगणारे अॅपच मोबाईलवर उपलब्ध झाल्याने गृहिणींसमोरील फराळाचा प्रश्न अगदी सहज मिटला आहे.
सध्या स्मार्ट फोनवर अशा प्रकारचे अॅप उपलब्ध झाल्याने मोठय़ा प्रमाणात हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यात येत आहे. दिवाळी फराळामध्ये बेसनचे लाडू, चकली, करंजी, शंकरपाळी, पोह्याचा चिवडा, रव्याचे लाडू, शेव असे अनेक पदार्थ कसे बनवायचे याबद्दल सविस्तर माहिती यामध्ये पुरवण्यात आली आहे.
एवढेच नव्हे तर कोणता पदार्थ बनवताना किती माप असावे याची देखील माहिती या अॅप्लिकेशनमध्ये दिली आहे. त्यामुळे अनेक गृहिणी या अॅपची मदत घेत असल्याने यंदा ऑनलाईन मदतीने तयार करण्यात येणारा फराळ अधिकच चविष्ट होणार यात शंका नाही.
फटाक्यांचा आवाजही ऑनलाईन
दिवाळी डोळ्यासमोर ठेऊन टेक्नोसेव्हींसाठी चांगलीच प्रगती झाल्याचे समोर येत आहे. एरवी ऑनलाईन शॉपिंगसाठी होणारा वापर आता दिवाळीचा फराळ, रांगोळ्या यांसह दिवाळीला फटाके फोडण्यासाठी गेम्स देखील तयार करण्यात आले आहेत.
एरवी चारचाकी-दुचाकींची रेस, चोर-पोलीस, रम्मी, क्रिकेट यांसाख्या मिळणा-या गेम्सव्यतिरिक्त आता प्ले स्टोरवर सणांनुसार गेम्स झाले आहेत. लहान मुलांना छोटा भीमचे असणारे आकर्षण लक्षात घेऊन छोटा भीम, छोटा ब्लास्ट शिवाय फायर वर्क्स, दिवाळी क्रॅकर्स यांसारखे गेम्स कंपन्यांनी तयार केले आहेत. यामध्ये छोटा भीम गेमला १ लाख डाऊनलोड, फायर वर्क्स पाच लाख आणि क्रॅकल्सला १० हजार डाऊलनोड करण्यात आले आहे.