वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. १७ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेस ७, भाजपा ४, सेना २, गावविकास २, अपक्ष २ जागा मिळाल्या. गावविकास आघाडीच्या नगरसेवकांचा काँग्रेसलाच पाठिंबा असल्याने वैभववाडी नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता येईल, असा ठाम दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी केला आहे.
दरम्यान युतीनेही गावविकास व अपक्षांचा पाठिंबा मिळणार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या सर्व विजयी नगरसेवकांचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी काँग्रेसची विजयी मिरवणूक शहरातून काढली.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत घोषणांनी वैभववाडी दणाणून सोडली. भाजपा-सेनेने बाजारातून रॅली काढली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात सकाळी १० वा. मतमोजणीला सुरुवात झाली. सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहरात मोठी गर्दी केली होती.
१७ पैकी ४ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित १३ जागांसाठी निवडणुक पार पडली. कॉँग्रेस व अपक्षांचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- अक्षता अरुण जैतापकर (काँग्रेस) मते ३९ (विजयी), प्रभाग क्र. ५ संजय सखाराम चव्हाण (काँग्रेस) मते ७८ (विजयी), संपदा शिवाजी राणे (काँग्रेस) मते ४१ (विजयी), शोभा उत्तम लसणे (काँग्रेस) ३९ (विजयी), प्रभाग क्र. १० दिपा दिपक गजोबार (काँग्रेस) मते ४४ (विजयी), समिता संतोष कुडाळकर(काँग्रेस) मते ३५ (विजयी), रविंद्र श्रीधर तांबे (अपक्ष) मते ५१ (विजयी), स्वप्नील बाळकृष्ण इस्वलकर (अपक्ष) मते ३४ (विजयी) मिळाली आहेत.
वैभववाडीत राष्ट्रवादी आणि मनसेचा धुव्वा उडाला. राष्ट्रवादीचे गुलाबराव चव्हाण यांना या निवडणुकीत ६ मते मिळाली. मनसे तालुकाध्यक्ष सचिन तावडे यांना अवघी २ मते मिळाली आहेत. या दोन उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले.