सोलापूरचे माजी आमदार सिद्धराम पाटील यांचा मुलगा सुमित सिद्धराम पाटील याच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात एका मराठी चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेलवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार दाखल होऊन १५ दिवस झाले मात्र अद्यापही पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही किंवा कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आरोपी हा भाजपाच्या माजी आमदाराचा मुलगा असल्यामुळे पोलिसांवर काही दबाव येत आहे काय असा आरोप या पीडित मुलीने केला आहे. तसेच या पीडित मुलीचे वडील सोलापूरचे माजी जिल्हाधिकारी असल्याने लोकप्रतिनिधी विरुध्द प्रशासकीय अधिकारी यांच्यात आता संघर्षाची शक्यता आहे.
पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, आमदारपुत्र सुमित आणि पीडित मुलगी दोघेही सोलापूरचे असल्याने त्यांच्यात ओळख होती. सुमितने तिला सर्वप्रथम नववर्षाच्या शुभेच्छा देणारा मॅसेज पाठवला. त्यानंतर त्यांच्यातील मैत्री वाढत गेली. दरम्यान सुमितने तिला लग्नाची मागणी घातली. होकार मिळाल्यानंतर सोलापूर, पुणे आणि मुंबईत अनेक वेळा लग्नाचे आमिष दाखवत त्याने तिच्याशी शारिरिक संबंध ठेवले. त्यातच ती गरोदर राहिली. तेव्हा तिने सुमितला लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. मात्र सुमितने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने लग्नासही नकार दिला. तसेच तिचा बनवलेला अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची तिला धमकी दिली.
या प्रकरणात सुमितचे वडील सिद्धराम पाटील यांनीही तिला आणि तिच्या आईला तक्रार मागे घेण्यासाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. या मॉडेलने ‘डोली अरमानो की, कुछ इस तरह, कहीं देर ना हो जाये,’ अशा हिंदी मालिकांमध्ये आणि काही मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.