मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत मेटा प्लॅटफॉर्मने अमेरिकेत मोठा बदल मान्य केला आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या वापरामुळे मुलांना व्यसनाधीन बनवले जात असल्याच्या आरोपांवर अमेरिकेतील अनेक राज्यांच्या अॅटर्नी जनरलसोबत मेटाने मोठी तडजोड केली आहे. या करारानुसार 18 वर्षांखालील यूजर्ससाठी दररोज दोन तासांची डीफॉल्ट वापरमर्यादा आणि मध्यरात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत ‘नाइट मोड’ लागू केला जाणार आहे. मेटाने मात्र कोणतीही चूक किंवा कायदेशीर गैरकृत्य केल्याचे मान्य केलेले नाही. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
नव्या कराराचा मुख्य उद्देश किशोरवयीन मुलांचा सोशल मीडिया वापर अधिक सुरक्षित आणि नियंत्रित करणे हा आहे. 18 वर्षांखालील वापरकर्त्यांसाठी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर एकत्रित दोन तासांची डीफॉल्ट दैनिक मर्यादा असेल. म्हणजे दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरलेला वेळ एकत्र मोजला जाईल. ही मर्यादा पालकांच्या परवानगीनेच बदलता येणार आहे.
मध्यरात्री 12 ते सकाळी 6 सोशल मीडिया बंद
नव्या नियमातील सर्वाधिक चर्चेचा निर्णय म्हणजे रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत फेसबुक आणि इंस्टाग्रामचा वापर बंद राहणार आहे. या काळात 18 वर्षांखालील यूजर्सना पोस्ट, स्टोरी, फीड, एक्सप्लोर किंवा रील्स पाहता येणार नाहीत. पालकांना हा निर्बंध काही परिस्थितीत उठवण्याची सुविधा असेल.
शाळेच्या वेळेतही नोटिफिकेशनवर नियंत्रण
मेटा किशोरवयीन मुलांसाठी ‘स्कूल मोड’ही लागू करणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पुश नोटिफिकेशन डीफॉल्ट स्वरूपात बंद ठेवले जातील. मात्र, थेट संदेश किंवा खाते-सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या सूचना याला अपवाद असतील. यामागे विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासाच्या वेळेत सोशल मीडियाकडे वारंवार वळू नये, हा उद्देश आहे.
मेटावर नेमके आरोप काय होते?
2023 मध्ये अमेरिकेतील अनेक राज्यांच्या अॅटर्नी जनरलनी मेटाविरोधात खटला दाखल केला होता. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर मुलांना जास्तीत जास्त वेळ गुंतवून ठेवणारी वैशिष्ट्ये जाणीवपूर्वक तयार केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच या प्लॅटफॉर्ममुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची माहिती पालक आणि जनतेपासून लपवली किंवा कमी लेखली, असाही आरोप होता.
मेटा देणार तब्बल 17.1 अब्ज डॉलर
या तडजोडीअंतर्गत मेटा राज्यांना जास्तीत जास्त 17.1 अब्ज डॉलर देणार आहे. ही रक्कम पुढील दहा वर्षांत देण्यात येणार असल्याचे अधिकृत माहितीत नमूद आहे. या प्रकरणाला अमेरिकेतील सर्वात मोठ्या Big Tech settlement पैकी एक मानले जात आहे. मात्र, रकमेचा अंतिम परिणाम आणि करारातील अटी न्यायालयीन प्रक्रियेशी जोडलेल्या आहेत.
मुलांसाठी आणखी कोणते बदल होणार?
फक्त वेळेची मर्यादा आणि रात्रीची बंदी एवढ्यावरच बदल थांबणार नाहीत. 18 वर्षांखालील वापरकर्त्यांसाठी लाईक्स आणि रिअॅक्शनची संख्या लपवणे, कॉस्मेटिक फिल्टर्सवर निर्बंध, अधिक कडक वय पडताळणी आणि पालकांसाठी नियंत्रणाची साधने उपलब्ध केली जाणार आहेत. किशोरांना अल्गोरिदमवर आधारित फीडऐवजी नॉन-पर्सनलाइज्ड फीड निवडण्याचाही पर्याय दिला जाणार आहे.
हा नियम भारतातही लागू होणार का?
सध्या ही तडजोड अमेरिकेतील 18 वर्षांखालील वापरकर्त्यांशी संबंधित आहे. त्यामुळे भारतातील मुलांसाठी फेसबुक-इंस्टाग्राम आपोआप रात्री बंद होतील, असा अर्थ काढता येणार नाही. मेटाने मात्र याच प्रकारच्या संरक्षणात्मक उपायांना इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनीही स्वीकारावे, असे आवाहन केले आहे. त्यामुळे भविष्यात या नियमांचा अमेरिकेबाहेरील देशांवरही अप्रत्यक्ष प्रभाव पडतो का, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
