शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरमध्ये आयोजित केलेल्या जेन झीच्या कार्यक्रमावरुन निशाणा साधला आहे. फडणवीसांचा कार्यक्रम म्हणजे कार्यक्रमात कार्यक्रम उरकून घेतल्याचा प्रकार झाला का? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला. तसेच राहुल गांधींचे कार्यक्रम पाहून भाजपा आता काँग्रेसला कॉपी करतेय की काय? असा सवालही रोहित पवारांनी केला आहे. एवढ्यावरच न थांबता फडणवीसांच्या कार्यक्रमाला आलेला क्रिकेटपटू तिलक वर्मावरूनही रोहित पवारांनी निशाणा साधला आहे. ते अमरावतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
गेल्या तीन महिन्यात नागपूर शहरात 32 खून झाले तुम्ही…
“स्वतःहून आलेले लोक आणि आणलेली लोक हे जर तुम्हाला बघायचं असेल तर राहुल गांधी यांचा कार्यक्रम हा स्वतः आलेल्या लोकांचा कार्यक्रम होता,” असं रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरमधील कार्यक्रमावर टीका करताना म्हटलं आहे. “नागपुरातील कार्यक्रम हा आणलेल्या लोकांचा होता, मुख्यमंत्र्यांना सामान्य लोकांनी विचारले असते तर काय झालं असतं, गेल्या तीन महिन्यात नागपूर शहरात 32 खून झाले तुम्ही गृहमंत्री आहात काय करत आहात?” असा सवाल रोहित पवारांनी विचारला.
अशाप्रकारे संवाद होत नाही
“ठरवून दिलेले प्रश्नांचे उत्तर दिले, क्रिकेटर तिलक वर्मा हा देखील तिथे आला होता. गर्दी आणण्यासाठी तिलकसारख्या सेलिब्रिटीला आणलं होतं का हे त्यांनाच माहीत, पण अशाप्रकारे संवाद होत नाही. संवाद लोकात जाऊन होतो आम्हाला तुमच्या मनाची बात नको आम्हाला जनाची म्हणजे लोकांची गोष्ट ऐकायचा आहे,” असा टोला रोहित यांनी लगावला. तसेच, “सेट प्रश्न देऊन कार्यक्रम करत होते,” असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
कार्यक्रमात कार्यक्रम घेतला का?
“जे लहान मुलं होते मग त्यांना संधी द्यायला पाहिजे, 4000 ढोल वादक तिथे आले होते त्यावर आमचा आक्षेप नाही पण ज्या वेगवेगळ्या स्पर्धा करून मुलांना बोलावलं, मग ती मुलं बक्षीस घ्यायला आली असतील, तिलक वर्माला बघायला आली असतील. त्यात तुम्ही ‘जेन झी’ संवाद ठेवला मग कार्यक्रमात कार्यक्रम घेतला का?” असा सवाल रोहित पवारांनी विचारला आहे. “राहुल गांधींचा कार्यक्रम बघून भाजपसुद्धा काँग्रेसला कॉपी करत आहे असं वाटायला लागलं आहे,” असंही रोहित म्हणाले.
राहुल गांधींसाठी बोर्ड लावण्यावरुन काय म्हणाले रोहित?
राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी पुण्यात रोहित पवारांनी लावलेल्या बोर्डवरुन त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी, “आमच्या पक्षातच काँग्रेस आहे. पवार साहेबांनी सुरुवातच काँग्रेसपासून केली. आम्ही काँग्रेस सोबत आहोत. महाविकास आघाडीत आहोत. मी जर राहुल गांधी यांचे बोर्ड लावलेल्या चुकीचं काय आहे?” असा उलट प्रश्न केला. “महाराष्ट्रात आम्हाला विरोधी पक्ष नेता नाही दिला, राहुल गांधी यांचे स्वागत केले यात वाईट काय?” असा प्रश्नही केला.
