पुण्यात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, काही क्षणांत बाळानेही गमावला जीव; रुग्णालयावर गंभीर आरोप, नातेवाईक संतापले!

प्रसूतीसाठी मायमर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या ३७ वर्षीय महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त करत डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच महिला आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. मृत महिलेचे नाव रूपाली सोमनाथ इंदलकर (वय ३७, रा. कुसगाव बुद्रुक, ता. मावळ) असे आहे. प्रसूतीसाठी त्यांना मायमर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान महिला आणि तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करत, मायमर हॉस्पिटलविरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. घटनेची माहिती मिळताच मावळचे आमदार सुनील शेळके यांनी रुग्णालयात जाऊन नातेवाईकांची भेट घेतली. त्यांनी नातेवाईकांशी चर्चा करून या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले. रुग्णांच्या जीवाशी संबंधित कोणत्याही प्रकारचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, महिला आणि नवजात बाळाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, उपचारादरम्यान काही वैद्यकीय त्रुटी झाल्या होत्या का, तसेच या प्रकरणात नेमकी कोणाची जबाबदारी आहे, हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, एका मातेचा आणि तिच्या नवजात बाळाचा एकाचवेळी झालेला मृत्यू आणि त्यानंतर नातेवाईकांनी केलेले गंभीर आरोप यामुळे मायमर हॉस्पिटलच्या वैद्यकीय उपचारपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आमदार सुनील शेळके नेमकं काय म्हणाले?

या दुर्दैवी घटनेनंतर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी संताप व्यक्त केला आहे. “रुग्णाचं हित लक्षात घेऊन आरोग्य सेवा दिली पाहिजे. केवळ पैशांसाठी आरोग्य सेवा दिली जात असेल, तर अशा रुग्णालयावर कारवाई करून ते बंद करण्याची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही. आज ना उद्या या प्रकरणातील सत्य समोर येईल. पुरावे लपवण्याचा प्रयत्न झाला, तर या प्रकरणात एसआयटीमार्फत चौकशी लावू. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिला आणि नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टर आणि संबंधित रुग्णालय या मृत्यूस जबाबदार असल्याचा त्यांचा आरोप आहे. ही पहिली घटना नाही. यापूर्वीही अशा तीन ते चार घटना घडल्याची माहिती आमच्यासमोर आली आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री आणि पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात ऑन-कॅमेरा शवविच्छेदन करण्यात येईल. त्यानंतर नेमकं सत्य काय आहे, हे समोर येईल,” असं सुनील शेळके म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *