कुटुंब हरिनाम सप्ताहात दंग, खोलीत १९ वर्षीय सूरजने मृत्यूला कवटाळलं; चिठ्ठी वाचून सगळ्यांनाच धक्का

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या अभ्यासाच्या ताणतणावातून एका १९ वर्षीय होतकरू विद्यार्थ्याने स्वतःचे आयुष्य संपवल्याची मन हेलावून टाकणारी घटना वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने पालकांसाठी लिहिलेली भावुक सुसाईड नोट पोलिसांना सापडली असून, यामुळे संपूर्ण वैजापूर तालुक्यात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सूरज सुभाष शिंदे (वय १९) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, गावात हरिनाम सप्ताह सुरू असल्याने घटनेच्या वेळी घरातील सर्व सदस्य सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांनी सूरजला फोन केला; मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. संशय आल्याने सुभाष शिंदे यांच्या लहान मुलीने वरच्या खोलीत जाऊन पाहिले असता, सूरज गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.​ तिने मोठ्याने आक्रोश केल्यानंतर खाली उभे असलेले कुटुंब व ग्रामस्थ वरच्या खोलीकडे धावले. त्यांनी तात्काळ सूरजला खाली उतरवून उपचारासाठी वैजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

“काळजी घ्या अन् आनंदी राहा”

सूरज हा नेहमीप्रमाणे आपल्या घरातील वरच्या खोलीत नीट (NEET) परीक्षेचा अभ्यास करत होता. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठीत लिहिले होते की, “सॉरी, आई आणि अप्पा… नक्कीच पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर बनेल. काळजी घ्या आणि आनंदी रहा.”

​डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून रात्रीचा दिवस करणाऱ्या एका निष्पाप तरुणाने असा टोकाचा निर्णय घेतल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर वस्तीवरील शेतात शोकाकुल वातावरणात सूरजवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *