मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका

मुंबईसह महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकाला मराठी  येत नसल्यास त्याचे थेट लायसन्स आता रद्द करण्यात येणार आहे. या शासन निर्णयासंदर्भात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठोस भूमिका घेत आता कारवाईचा इशारा दिला आहे. याच मुद्दयावर बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, मराठी न येणाऱ्या चालकाला सुरुवातीला एक महिन्याची नोटीस देऊन भाषा शिकण्याची संधी दिली जाईल. नोटीस देऊनही मराठी न शिकल्यास चालकाचे लायसन्स 3 महिन्यांसाठी निलंबित केले जाईल. तर त्यानंतरही नियमाचे पालन न केल्यास चालकाचा परवाना कायमस्वरूपी  रद्द करण्याची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

रोजगार बुडावा ही आमची अपेक्षा नाही, परंतु मराठी अस्मिता टिकवणे गरजेच

पुढे बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले कीआता पर्यंत 1 लाख 65 हजार अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी शिकण्याचे प्रशिक्षण घेतले. 1989 च्या नियमानुसार मराठी अनिवार्य आहे. मुंबई सर्वांना कुशीत घेवून पुढे जाते. उद्यापासून (20 ऑगस्ट) कारवाईला सुरूवात करू. रोजगार बुडावा ही आमची अपेक्षा नाही, परंतु मराठी अस्मिता टिकवणे गरजेचे आहे. काहींनी व्हिडिओ प्रकाशित करून मराठी बोलणार नसल्याची मग्रूरी केली, कायद्यानुसार आता त्यांच्यावर कारवाई करू. असेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

अशातच, मराठी शिकला नाहीत तर कारवाई अटळ आहे. व्यावहारिक मराठीचे ज्ञान आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे. व्हिडिओ रेकॅार्ड करून त्याला लायसन्स, बॅच दिली जाईल. लायसन्स देताना डोमेसाईल तपासावे लागेल. आरटीओचे वायुवेग पथक आहे. ज्यांच्याकडे मराठी प्रशिक्षणाचे सर्टिफिकेट नाही व मराठीही बोलता येणार नाही, त्यांच्यावर करवाई केली जाईल. असा ईशाराही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

 धमक्यांना मी घाबरत नाही, मग्रुरी आणि मुजोरीला कायद्याच्या कक्षेत राहून उत्तर देवू

तर, मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या उत्तर भारतीय रिक्षा चालक असलेला संजय दुबे याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत विरोध केला आहे. ‘जो उत्तर भारतीय रिक्षा चालक मराठी बोलणार नाही त्याचे लायसन्स रद्द करण्यात येईल असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. पण मी रिक्षा पण चालवणार, पैसे देखील कमावणार आणि मराठीही बोलणार नाही. जा.. मराठी बोलणार नाही…’ असे म्हटले आहेयावर बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की ‘काही रिक्षा चालकाने मुजोरपणा दाखवला आहे. अशा धमक्यांना मी घाबरत नाही. कायद्यात राहून कारवाई करणार. तर मग्रुरी आणि मुजोरीला आम्ही कायद्याच्या कक्षेत राहून उत्तर देवू असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *