मराठी बोलणार नाही, पैसेही कमावणार,’ असे वक्तव्य करत परिवहन विभागालाच आव्हान देणाऱ्या एका उद्दाम रिक्षाचालकाचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची दखल घेत आरटीओने संबंधित रिक्षाचालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. व्हिडीओमध्ये संबंधित रिक्षाचालक मराठीत संवाद साधण्यास नकार देताना दिसत आहे. तसेच रिक्षा व्यवसायातून पैसे कमावणार असल्याचे सांगत त्याने थेट परिवहनमंत्र्यांनाच आव्हान दिल्याचे व्हिडिओतून समोर येत आहे. त्यामुळे या प्रकाराची शहरात चर्चा सुरू झाली आहे.
हा व्हिडीओ नेमका कुठे आणि कधी चित्रित करण्यात आला, संबंधित रिक्षा कोणाच्या नावावर आहे, तसेच चालकाकडे आवश्यक कागदपत्रे आहेत का, याची माहिती आरटीओकडून घेतली जात आहे. व्हिडिओच्या आधारे रिक्षाचालकाची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती वाशीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांनी दिली.
