कारवाई करताना नियमपालन केले नसल्याबद्दल पाच लाखांच्या दंडाचा फटका बसलेल्या ‘एफडीए’ला मंगळवारीही मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात फटकारले. अधिकाऱ्यांकडून नियमांप्रमाणे कारवाई होत नसल्याबद्दल प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
उत्पादनाचे ‘मिसब्रँडिंग’ केल्याच्या कारणाखाली ‘जेएनटीएल कन्झ्युमर हेल्थ प्रा. लि.’ कंपनीचा ठाण्यातील २.२४ कोटी रुपयांचा शीतपेयांचा साठा ‘एफडीए’ने तपासणीनंतर जप्त केला. त्याला कंपनीने ॲड. हर्ष गुरसहानी यांच्यामार्फत याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. ‘एफडीएने २ व ३ जून रोजी आमचा शीतपेयांचा साठा जप्त केल्यानंतर आम्ही वारंवार अर्ज करूनही अन्न विश्लेषण अहवाल देण्यात आला नाही. जप्त केलेल्या पॅकबंद पेयांची ठरावीक शेल्फ लाइफ आहे. परिणामी आमचे खूप मोठे, भरून न निघणारे नुकसान होत आहे’, असे कंपनीने ज्येष्ठ वकील डॉ. बिरेंद्र सराफ यांच्यामार्फत मांडले. मात्र एफडीएच्या वकिलांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही.
‘चूल मटण’चा परवाना निलंबित
स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोहगाव येथील ‘हॉटेल चूल मटण’चा परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) निलंबित केला. नियमांचे पालन होईपर्यंत हॉटेल सुरू न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अन्न पदार्थांबरोबरच गुटखा विक्रीवरही ‘एफडीए’ने कारवाई केली. विभागात १४ ते १७ ऑगस्टदरम्यान पुणे विभागात कारवाई करून १० लाख सात हजार ४६० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तीन प्रकरणांमध्ये पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करून सात जणांना अटक करण्यात आली. दोन आस्थापना बंद करण्यात आल्या असून, सात लाख रुपये किमतीचे एक वाहनही जप्त करण्यात आले.
ब्लिंकिटच्या सातारा, हर्सूल परिसरातील आस्थापनांचा अन्न परवाना निलंबित
छत्रपती संभाजीनगर शहरातील मेसर्स ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड (ब्लिंकिट) या ऑनलाईन अन्न साठवणूक व वितरण करणाऱ्या कंपनीच्या सातारा व हर्सूल परिसर अशा दोन आस्थापनांचा एफएसएसएआय अन्न परवाना मंगळवारी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) निलंबित केला आहे. विभागाच्या तपासणीत अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि कायदेशीर नियमांचे उल्लंघन झाल्याचे विभागाने म्हटले आहे.
