नाशिकमध्ये डेंग्यूचा प्रकोप;महापालिका ॲक्शन मोडवर , नोटिसांचा डोस

पावसाने विश्रांती घेतली असली,तरी शहरात डेंग्यूसह साथीच्या आजारांचा प्रकोप वाढल्यानंतर महापालिकेचा मलेरिया विभाग अॅक्शन मोड वर आला आहे.या प्रकरणी शासकीय कार्यालयांसह एकूण २०८ आस्थापनांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

२०८ आस्थापनांना कारणे दाखवा नोटिसा

डेंग्यूच्या अळ्या आढळल्याने महापालिकेच्या मलेरिया विभागाने ऑगस्ट जिल्हा परिषद , नाशिकरोड रेल्वे स्टेशन, सामानगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन यांसह आठ शासकीय कार्यालये आणि एकूण २०८ आस्थापनांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्याची माहिती मलेरिया विभागप्रमुख डॉ.रवींद्र ढोले यांनी दिली. दरवर्षी पावसाळ्यात साथरोगांची प्रादुर्भाव वेगाने वाढतो.

नाशिकमध्ये डेंग्यूचे थैमान

डेंग्यू, चिकुनगुन्या,मलेरिय, स्वाइन फ्लू यांसारख्या कीटकजन्य आजारांची लागण होते. यंदाही नाशिकमध्ये डेंग्यूने थैमान घातले आहे. रिकामे प्लॉट,बांधकामस्थळे ,बेसमेंट, स्क्रॅप डेपो, टायर दुकाने ,छतावरील पाण्याच्या टाक्या आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणी डेंग्यूच्या अळ्यांची निर्मिती होते.

असा वाढला प्रादुर्भाव

जूनपर्यंत डेंग्यूची रुग्णसंख्या आटोक्यात होती. जानेवारीत ६, फेब्रुवारीत ३, मार्चमध्ये २, एप्रिलमध्ये १, मेमध्ये ३ तर जूनमध्ये जेमतेम ८ रुग्ण होते. जुलैमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमुळेडेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली.त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला.जुलै महिन्यात डेंग्यूचे ३३ रुग्ण आढळले.

धुरफवारणी कागदावर?

आरोग्य विभागाकडून शहरभर धूरफवारणी, फॉगिंग आणि अळीनाशक फवारणी केली जात असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्ष धूरफवारणी कागदावरच होत असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.धूरफवारणीचा ठेका संपुष्टात आल्यानंतर ठेकेदारांना महिानाभराची मुदतवाढ मिळाली आहे. मात्र, त्यांच्याकडून कागदावरच धूरफवारणी केली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे डेंग्यूमुक्त नाशिकासाठी सुरू केलेल्या मोहिमेलाच ब्रेक लागल्याची टीका होत आहे.

ऑगस्टमध्ये १४ दिवसांतच २९ नवे रुग्ण

ऑगस्ट महिना सुरू होताच डेंग्यूचा प्रादुर्भाव दुपटीने वाढला. ऑगस्टच्या पहिल्या १४ दिवसांतच डेंग्यूचे २९ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या डेंग्यू रुग्णांची संख्या ८२ वर गेली. स्वाइन फ्लूमुळे तिघांचा बळी गेला आहे. त्यामुळे मलेरिया विभागाने आक्रमक भूमिका घेत घराघरांत तपासणी आणि अळी शोधमोहीम हाती घेतली आहे.या मोहीमेत शासकीय कार्यालयांसह बांधकाम साइटवर डेंग्यूच्या अळ्या पथकांना आढळून आल्या. त्यामुळे आतापर्यंत २०८ आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यात जुलै महिन्यात १२० तर ऑगस्टमध्ये ८८ आस्थापनांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *