आश्रमशाळेत शिपायाने केला विद्यार्थ्यांवर अत्याचार, जबाबात धक्कादायक माहिती उघड, ४४ वर्षीय राजेशला अटक

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुसागोंदी येथील एका निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आश्रमशाळेत सेवक म्हणून कार्यरत असलेल्या ४४ वर्षीय राजेश मूलचंद मालापुरे याच्याविरोधात कोंढाळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. दोन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा, तसेच एका विद्यार्थ्यासोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्टच्या रात्री आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्यासोबत लैंगिक शोषणाची घटना घडल्याची माहिती समोर आली. त्याचबरोबर दुसऱ्या एका विद्यार्थ्यासोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न झाल्याचेही तपासात समोर आले आहे. पीडित विद्यार्थ्यांनी याबाबत आश्रमशाळेच्या अधीक्षकांकडे तक्रार केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अधीक्षकांनी तातडीने कोंढाळी पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान, या घटनेची माहिती रात्री उशिरा बाल संरक्षण विभागाच्या हेल्पलाइनवर मिळाली. त्यानंतर नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार जिल्हा महिला व बाल संरक्षण विभागाचे पथक कोंढाळी पोलिसांसह आश्रमशाळेत दाखल झाले. पथकाने विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्राथमिक माहिती घेतली. चौकशीदरम्यान एका अल्पवयीन विद्यार्थिनीनेही तिच्यासोबत गैरकृत्य झाल्याची माहिती दिल्याचे बाल संरक्षण विभागाचे अधिकारी मुस्ताक पठाण यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायदा, बाल न्याय अधिनियम तसेच ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

घटनेची व्याप्ती आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी जिल्हा महिला व बाल संरक्षण विभागाच्या पथकाकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. आश्रमशाळेत निवासी असलेल्या सर्व २६० विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. तसेच आश्रमशाळेतील वातावरण, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची व्यवस्था आणि अन्य कोणते गैरप्रकार घडले आहेत का, याचीही तपासणी केली जात आहे. निवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या व्यवस्थेवरही आता प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. काटोल उपविभागीय पोलीस अधिकारी पराग पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढाळी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *