भूताटकीच्या अफवेनंतर ‘डोमा’तील मुलींसाठी २८८ बेडचे नवे वसतिगृह ; घरी गेलेल्या मुलींच्या परतीची आशा

मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील डोमा शासकीय निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या वसतिगृहाचा गंभीर प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. क्षमतेपेक्षा तिप्पट विद्यार्थिनींचा भार असलेल्या जुन्या वसतिगृहाऐवजी प्रशस्त नवीन इमारतीत विद्यार्थिनींचे स्थलांतर करण्यात येणार आहे. १ सप्टेंबरपासून नवीन वसतिगृहाचा नियमित वापर सुरू होणार आहे. नवीन इमारतीत २८८ बेडची व्यवस्था करण्यात आली असून, स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा विद्यार्थिनींना उपलब्ध होणार आहे.

वसतिगृहाची क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थिनी राहत होत्या

डोमा आश्रमशाळेतील वसतिगृहाची क्षमता अवघ्या १०० विद्यार्थिनींची असताना येथे ३००हून अधिक मुली राहत होत्या. एकाच बेडवर दोन-तीन मुलींना झोपण्याची वेळ येत होती. अपुरी व सुविधा नसलेली स्वच्छतागृहे, उकाडा, पंख्यांचा अभाव आणि मर्यादित जागा यामुळे विद्यार्थिनींच्या दैनंदिन जीवनावर मोठा ताण निर्माण झाला होता.

भूताटकीच्या अफवा …..

याच पार्श्वभूमीवर काही विद्यार्थिनींमध्ये अचानक रडणे, हसणे, आरडाओरड करणे किंवा कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद न देणे अशी लक्षणे दिसून आली. त्यानंतर परिसरात भुताटकीच्या अफवा पसरल्या. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर हा प्रकार मानसिक आजाराशी अर्थात ‘मास हिस्टेरिया’शी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले.

परिणामी ३०० हून अधिक मुली आश्रम सोडून गेल्या.

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत मुलींना झालेल्या भूतबाधेच्या अफवेने या आश्रमातील अनेक मुलींनी शाळा सोडल्याचे समोर आले होते. अपुऱ्या आश्रमातील सोयींचा परिणाम हा या आश्रमात राहणाऱ्या मुलींच्या मानसिकतेवर झाला.अचानक हसणे, रडणे , मुलींनी अचानक घुंगरांचे आवाज येणं असे प्रकार घडायला लागले. आणि ही वार्ता गावात समजताच या घटना भूतबाधेच्या समजल्या गेल्या. परिणामी ३०० हून अधिक असणाऱ्या मुली आश्रम सोडून गेल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *