पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पिंपळवंडी गावात एका नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून खून करण्यात आला. या धक्कादायक कृत्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, काल मंगळवारी दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास ही घटना घडली. पीडित मुलगी अचानक बेपत्ता झाल्यानं तिच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणानं ओळखीचा गैरफायदा घेतला. त्यानेबालिकेला सायकलवरून जवळच असलेल्या उसाच्या शेतात नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा दाबून निर्घृणपणे जीव घेतला.
आमदाराच्या गावातच धक्कादायक घटना
स्थानिक आमदाराचं गाव असलेल्या पिंपळवंडीत ही घटना घडल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली. स्थानिक तपास यंत्रणांच्या मदतीने पोलिसांनी संशयिताला तात्काळ ताब्यात घेतलं आहे. या अमानुष घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ व नातेवाईकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे. तर हे प्रकरण फास्ट ट्रक न्यायालयात चालवून पीडितेला तातडीने न्याय देण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. जुन्नरचे आमदार शरद सोनवणेंच्या गावातच ही धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.
गेटजवळ विवाहितेचा संशयास्पद मृत्यू
कंपनीच्या कामानिमित्त मित्रासोबत वाडीवऱ्हे परिसरात गेलेल्या सिडकोतील ३४ वर्षीय महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. संबंधित महिला मित्रासोबत एका रिसॉर्टमध्ये जेवण केल्यानंतर बाहेर पडत असताना, तिच्या मित्राचे नियंत्रण सुटल्याने कार प्रवेशद्वाराला धडकली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, हा अपघात आहे, की घातपात याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मित्रासोबत रिसॉर्टवर जेवायला
रुपाली नीलेश पाटील (वय ३४, रा. शिवनारायण अपार्टमेंट, एकदंतनगर, अंबड, नाशिक) असे मृत महिलेचे नाव आहे. रुपाली या सिडको परिसरातील एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये कार्यरत होत्या. मंगळवारी कंपनीच्या कामानिमित्त त्या एका मित्रासोबत वाडीवऱ्हे परिसरात गेल्या होत्या. तेथून दोघे एका रिसॉर्टमध्ये जेवणासाठी गेले.
नियंत्रण सुटून कार रिसॉर्टच्या प्रवेशद्वारावर धडकली
जेवण झाल्यानंतर रिसॉर्टमधून बाहेर पडत असताना, तिच्या मित्राचे कारवरील नियंत्रण सुटले. कार रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराला धडकली. यामुळे रुपाली पाटील या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
