मुंबईकरांसाठी नव्या प्रवासाचा आरंभ, मेट्रो 2B चे लोकार्पण, तर WEH ला BKC शी थेट जोडणारा शीव-चेंबूर लिंक रोड खुला

 मुंबईकरांना मेट्रो आणि रस्ते प्रवासाचा नवा पर्याय आता उपलब्ध होणार आहे. मुंबईकरांच्या रस्ते आणि मेट्रो प्रवासाला वेग देण्यासाठी आज, गुरुवारी दोन प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. डायमंड गार्डन ते चेंबूर मेट्रो मार्गिका २ बीच्या विस्तारासह पश्चिम द्रुतगती महामार्गाला थेट बीकेसीला जोडणारा १.४ किलोमीटरचा शीव-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे. दुसरीकडे, ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यांच्या दुसऱ्या बोगद्यासाठी ‘अर्जुना’ टीबीएमच्या मदतीने खोदकाम सुरू होणार आहे.

मेट्रो २ बी मार्गिका चेंबूरपर्यंत खुली

डी. एन. नगर ते मंडाळे ही मेट्रो २ बी मार्गिका चेंबूरपर्यंत खुली होणार आहे. चेंबूर मेट्रो स्थानक हे व्ही. एन. पुरव मार्गावरील मोनो रेल स्थानकापासून १०० मीटर अंतरावर आहे. चेंबूर मोनो रेल स्थानकापासून चेंबूर रेल्वे स्थानक २०० मीटर अंतरावर आहे. यामुळे चेंबूरपर्यंत मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोनो, मेट्रो आणि हार्बर लोकल असे तिन्ही वाहतुकीचे पर्याय प्रवासासाठी उपलब्ध होणार आहेत. चेंबूरसह पूर्व उपनगरांतील प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मेट्रो २ बीचा डायमंड गार्डन ते मानखुर्द हा टप्पा ८ एप्रिलपासून खुला झाला होता.

कलानगरमार्गे वळसा टळणार

सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडच्या (एससीएलआर) शेवटच्या १.४ किमी लांबीच्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात ५०० मीटर लांबीचा चारपदरी उन्नत मार्ग, तसेच ९०० मीटर लांबीचे दोनपदरी प्रवेश आणि बाहेर पडण्याचे उड्डाणपूल मार्ग आहेत. ही सर्व कामे पूर्ण झाली असून सध्या उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाकोला जंक्शनपासून थेट भारतनगर, वांद्रे कुर्ला संकुलापर्यंत पोहोचण्यासाठी हा अंतिम टप्पा महत्त्वाचा आहे. हा मार्ग खुला झाल्यावर कलानगरमार्गे वळसा टळणार आहे. बॅ. बाबासाहेब अनंतराव भोसले उड्डाणपूल असे या बीकेसी कनेक्टरचे नामकरण करण्यात आले आहे.

पुण्यातील गंगाधाम उड्डाणपुलाची दिशा ठरली

दुसरीकडे, अत्यंत वर्दळीच्या आणि तीव्र उतारामुळे अपघातांचे केंद्र ठरलेल्या पुण्यातील मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकातील उड्डाणपुलाची दिशा अखेर निश्चित झाली आहे. लोकप्रतिनिधींच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे पुलाची दिशा ठरत नव्हती. अखेर आता मार्केटयार्ड पीएमपी डेपोकडून बिबवेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपूल करण्याचा, तर झाला कॉम्प्लेक्सपासून बिबवेवाडी कोंढवा रस्त्याला जोडरस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *