उत्तर प्रदेश येथून मुंबईत आलेले आरिफ शेख , त्यांची पत्नी मरजीना, दोन वर्षांचा मुलगा अबान आणि चार वर्षांची मुलगी मन्नत यांचा घाटकोपरमधील दरड दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. हे कुटुंब पंधरा दिवसांसाठी मुंबईत आले होते. शीव येथे नातलगांच्या घरी राहिल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच ते गौशिया चाळीतील पत्नीच्या बहिणीजवळ राहायला आले होते. तिने त्यांना एक खोली मिळवून दिली होती. आरिफच्या कुटुंबाने तिथे जेमतेम एक रात्र काढली आणि दुसऱ्याच दिवशी काळाने त्यांच्यावर घाला घातला.
चौकोनी कुटुंबाचा चटका लावणारा शेवट
घाटकोपरमधील दरड कोसळण्याच्या घटनेत या संपूर्ण कुटुंबाचा बळी गेला. नव्याने आयुष्य सुरु करण्याच्या आशेने अवघ्या चार दिवसांपूर्वीच ते मुंबईत आले होते. व्यवसायाने शिंपी असलेले आरिफ शेख हे आपली पत्नी मरजीना, चिमुरडी मुलं मन्नत आणि अबान यांच्यासह घाटकोपर (पश्चिम) येथील अशोक नगरमध्ये राहायला आले होते. मरजीनाची बहीण आधीपासूनच या परिसरात राहत होती.
शोकाकुल पिता
टिटवाळा येथे राहणारे त्याचे वडील मोहम्मद अली हे राजावाडी रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्राबाहेर दुःखात बुडालेले होते. “आपल्या कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल होईल या आशेने मी माझ्या मुलाला मुंबईला बोलावले होते. आज मात्र मी माझ्या मुलाचे, सुनेचे आणि दोन नातवंडांचे शव घेऊन परत जात आहे” असे ते शोकाकुल अवस्थेत म्हणाले.
मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूरचे असलेले हे कुटुंब चांगल्या आयुष्याच्या आणि मुलांच्या सुरक्षित भविष्याच्या शोधात मुंबईत आले होते. नातेवाईकांनी सांगितले की, आरिफला काम मिळण्याबाबत आशा होती आणि कुटुंबासाठी चांगले आयुष्य घडवण्याचे स्वप्न त्याने पाहिले होते. त्याची पत्नी गृहिणी होती, मात्र तीही पतीला आर्थिक मदत करण्यासाठी काहीतरी छोटे-मोठे काम करण्याच्या विचारात होती.
