मरण डोळ्यासमोर तरी कर्तव्य विसरली नाही, फ्लॅटला आग, घरकाम करणाऱ्या अंकिताची चिमुकल्या अबीरसाठी धाव, दोघांचाही वेदनादायी अंत

 विलेपार्ले पश्चिम येथील बाप्टिस्टा रोडवरील शांता भवन इमारतीच्या ११व्या मजल्यावरील दोन घरांना मंगळवारी रात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत अडीच वर्षांचा अबीर बटाविया आणि २३ वर्षीय अंकिता छेत्री यांचा मृत्यू झाला. धुरामुळे गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत एका अग्निशमन जवानासह आठजण जखमी झाले. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. परंतु इस्त्रीचा वीजपुरवठा बंद करण्यास विसरल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

बघता बघता आग पसरली

विलेपार्ले पश्चिमेतील सेंट झेवियर स्कूलजवळ तळ अधिक ११ मजली शांता भवन इमारत आहे. या इमारतीच्या ११व्या मजल्यावरील बटाविया कुटुंबाच्या फ्लॅट क्रमांक ११०१ आणि ११०२ मध्ये मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास आग लागली. घरातील विद्युत जोडणी, विद्युत उपकरणे, वातानुकूलन यंत्रणा, घरातील साहित्य, सोफा, पलंग, लाकडी सजावट, स्वयंपाकघरातील साहित्य आदींनी पेट घेतल्याने काही वेळातच धुराचे लोट इमारतीत पसरले. सुमारे चार हजार चौरस फुटांच्या क्षेत्रात आग पसरली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस आणि महापालिका यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने मोहीम हाती घेतली. पहाटे एक वाजताच्या सुमारास आग पूर्णपणे विझवण्यात आली. या बचावकार्यात अग्निशमन जवान मनोज सोनवणे हेही जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. एकूण आठ जखमींपैकी सहाजणांना नानावटी मॅक्स रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी अबीर आणि अंकिता यांना रुग्णालयात आणले असता मृत घोषित करण्यात आले.

पार्थ (३२) आणि हिरेन (६४) यांची प्रकृती स्थिर असून यशस्वी (३३) आणि अभिषेक यांनाही उपचारानंतर घरी सोडण्यात आले. कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शिवम द्विवेदी (२९) यांच्यासह अग्निशमन जवान मनोज सोनवणे यांनाही उपचारानंतर घरी सोडण्यात आले. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास अग्निशमन दल आणि पोलिसांकडून सुरू आहे, अशी माहिती विभागीय अग्निशमन अधिकारी, मरोळ येथील रवींद्र भोसले यांनी दिली.

शेवटच्या क्षणीही अबीरचा विचार

आपल्या शेवटच्या क्षणीही अंकिता छेत्रीच्या मनात लहानग्या अबीरचाच विचार होता. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या मते, आग पसरत असताना बटाविया कुटुंबातील घरकाम करणाऱ्या अंकिताने एका बेडरुममधून अबीरला उचलले आणि त्याला घेऊन त्या बेडरुमला जोडलेल्या बाथरूममध्ये आश्रय घेतला. बचाव पथकाला अबीर तिच्या छातीवर पडलेला आढळला; दोघेही बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना सीपीआर देण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.

नानावटी रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. कूपर रुग्णालयाच्या शवविच्छेदन केंद्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला असून त्यांना आगीमुळे भाजल्याच्या जखमा झाल्या नव्हत्या.

बिल्डर हिरेन बटाविया यांच्यासह कुटुंबातील इतर चार सदस्यांना नानावटी रुग्णालयात नेण्यात आले. रात्रभर निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. किरकोळ दुखापत झाल्यामुळे अग्निशमन दलाचा एक कर्मचारी आणि एका वॉचमनला कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते; उपचारानंतर त्यांनाही घरी सोडण्यात आले.

चिमुकल्याची बॉडी कुटुंबाच्या ताब्यात

अबीरचे आई-वडील, सिद्धार्थ आणि जयनी बटाविया आपल्या कुटुंबासह बुधवारी सकाळी चिमुकल्या अबीरचं शव ताब्यात घेण्यासाठी आले होते. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कुटुंबाला पार्थिव ताब्यात घेता आले. सांताक्रूझ पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय मसावेकर यांनी सांगितले की, अंकिता ही मूळची पश्चिम बंगालमधील होती आणि तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला आहे. आम्ही तिच्याबद्दल अधिक माहिती मिळवत आहोत, असे ते म्हणाले. तिचे कुटुंबीय शहरात येईपर्यंत आणि रक्ताच्या नात्यातील व्यक्तींची संमती मिळेपर्यंत तिचे शवविच्छेदन प्रलंबित राहील. तिच्या काही दूरच्या नातेवाईकांनी बॉडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता; मात्र अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *