राज्यात 5 वर्षांत तब्बल 36 हजार कंपन्यांना टाळे; मंत्री उदय सामंत म्हणाले, ‘केंद्र सरकारला चुकीचे…’

मागील पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रात तब्बल 36,211 खासगी कंपन्या बंद पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या एका अहवालात ही आकडेवारी उघड झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कंपन्या बंद पडत असल्याची माहिती समोर येताच, राज्यात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी यावरुन सरकारला घेरलं आहे. तर, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

36 हजार कंपन्या बंद झाल्याबाबत मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘राज्यातील 36 हजारांवर कंपन्या बंद झाल्याची माझ्याकडे कुठलीही माहिती नाही. एक दिवस द्या, मी तपासून सांगतो. केंद्र सरकारने हे सांगितले असले तरी महाराष्ट्राची स्थिती मला बघावी लागणार. मी केंद्र सरकारला चुकीचे ठरवत नाही, पण मला याची तपासणी करावी लागेल.’

चाकण औद्योगिक वसाहतीबाबत सुरू असलेल्या वादावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील एकही उद्योग बाहेर गेलेला नाही. ठाकरे सेनेने याचा मोठा गाजावाजा केला. मात्र तसे काहीही नाही. उलट काही कंपन्यांनी विस्तारासाठी अधिक जागेची मागणी आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.

कोणत्या शहरात किती कंपन्या झाल्या बंद

मुंबईः 12,009 कंपन्या बंद
पुणेः 6,433 कंपन्या बंद
ठाणे: 4,704 कंपन्या बंद
नागपूर: 1,478 कंपन्या बंद
नाशिक: 840 कंपन्या बंद
रायगड: 822 कंपन्या बंद
छत्रपती संभाजीनगर: 654 कंपन्या बंद

रोहित पवारांची टीका 

चाकण येथील अनेक उद्योग राज्यातील दुसऱ्या एमआयडीसीमध्ये गेलेले पाहायला मिळत आहेत. एमआयडीसी साठी मिळणाऱ्या सुविधा मिळत नाहीत रस्त्यात खड्डे झाले आहेत. यासोबतच 36 हजार कामगारांचा आकडा असा आहे. ज्यांच्या कंपन्या इतर राज्यात स्थलांतरित झाल्या आहेत हे घातक आहे. मात्र सरकार घोडेबाजार करण्यात पक्ष फोडण्यात व्यस्त आहे उद्योगांना काय हवं ते त्यांच्याकडून पाहिलं जात नाही हे मोठं दुर्दैवी आहे. सरकारकडून त्या ठिकाणी ए आय प्रकल्प उभारण्याचं सांगितलं जात आहे. मात्र हे आहे प्रकल्पासाठी पाणी आणि वीज मोठ्या प्रमाणात लागते तुलनेने नोकऱ्या कमी मिळतात त्यामुळे सरकारने कुठले उद्योग आणायचे याचा विचार केला पाहिजे सोबतच आहेत हे उद्योग कसे टिकतील याचाही विचार केला पाहिजे अन्यथा या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *