जळगावच्या चाळीसगाव (Chalisgaon) ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक अतिशय खळबळजनक घटना घडली आहे. यात आंबेहोल येथे गहाण ठेवलेली मोटर सायकल सोडविण्यासाठी पैसे मागण्याच्या वादातून आई आणि तिच्या 17 वर्षीय मुलाने पतीची हत्या (Jalgaon Crime News) केल्याची धक्कादायक घटना घडली. मयत करणसिंग रामसिंग पवार यांनी गहाण ठेवलेली मोटारसायकल सोडवण्यासाठी पत्नी अरुणाबाई करणसिंग पवार यांच्याकडे पैशांची मागणी केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी अल्पवयीन मुलानेही वादात हस्तक्षेप केला. दारू पिऊन त्रास देणे, तसेच परस्पर जमीन विकल्याच्या कारणावरून आधीच कुटुंबात वाद सुरू होते. अशातच या संतापाने आईने गळा आवळला तर मुलाने डोक्यात सायकलचा पंप मारत बापाचीच निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेने परिसरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
दारू पिऊन सतत त्रास, परस्पर जमीन विकल्याच्या कारणावरून आधीच कुटुंबात वाद
पोलिसांच्या माहितीनुसार, या वादातून अरुणाबाई यांनी दोरीने करणसिंग यांचा गळा आवळला, तर 17 वर्षीय मुलाने सायकलच्या पंपाने त्यांच्या डोक्यावर मारहाण केली. यात करणसिंग यांचा मृत्यू झाला. दरम्यान, करणसिंग यांचा याआधी देखील दारू पिऊन त्रास देणे तसेच परस्पर जमीन विकल्याच्या कारणावरून कुटुंबात वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. खून झाल्याची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अरुणाबाई पवार आणि त्यांच्या 17 वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
संतापजनक! दहा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर 60 वर्षीय व्यक्तीकडून अत्याचार
पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे येथे एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. यात दहा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली 60 वर्षीय झुंबर सिताराम खोमणे याच्याविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. 11 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलय. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पोक्सो कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास जेजुरी पोलिसांकडून सुरू आहे.
