श्रावण महिन्यापासून भारतात सण-समारंभांना सुरुवात होते. मात्र यंदा ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांवर महागाईचा बोझा पडण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. इराण युद्ध आणि आखाती देशांतील वाढत्या तणावामुळं कच्च्या मालाच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे देशातील प्रमुख एफएमसीजी कंपन्या सप्टेंबर तिमाहीत उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत.
एफएमसीजी कंपन्यांनी दर वाढवल्यास ऐन सणासुदीमध्ये रोजच्या वापराच्या चहा, बिस्कीट, तेल, साबण, पीठ, तांदूळ, मसाले, टूथपेस्ट इत्यादी ‘वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. एफएमसीजी कंपन्यांनी एप्रिल-जून तिमाहीत सरासरी 2 ते 5 टक्के दरवाढ केली, तर जुलै-सप्टेंबर या तिमाहीमध्ये किमती स्थिर ठेवल्या, मात्र पॅकेटमधील वस्तूचे वजन कमी केले.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या मालाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहे. पाम तेल, साखर, कच्च्या तेलाच्या अस्थिर किमतीमुळे कंपन्याच्या मार्जिनवर परिणाम होत आहे. त्याचबरोबर मान्सून आणि अल निनोसारख्या हवामानासंबंधित परिस्थितीताही परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे.
ब्रिटानिया 2 टक्क्यांनी वाढवू शकतात किंमती
बेकरी उत्पादने बनवणारी देशातील प्रमुख कंपनी ब्रिटानियाने देखील साखर आणि पाम तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने 5 आणि 10 रुपये किंमत असलेल्या बिस्कीट पुड्याचे वजन कमी केले आहे. आधी 10 बिस्किटे मिळत होती, तर त्याऐवजी 8 बिस्किटे मिळतील.
गोदरेजदेखील वाढवू शकते किंमत
गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड चालू तिमाहीतही किमती वाढवू शकते. तथापि, जोपर्यंत वस्तूंच्या किमतींचा कल स्पष्ट होत नाही, तोपर्यंत कंपनीला कोणताही मोठा निर्णय घ्यायचा नाही. कंपनीचे सीईओ सुधीर सीतापती म्हणाले की, कच्च्या तेलाच्या किमतींमधील अस्थिरतेमुळे कंपनीने आतापर्यंत मोठी दरवाढ टाळली आहे. ते म्हणाले की, जून तिमाहीप्रमाणेच कंपनीला सप्टेंबर तिमाहीतही किमती वाढवाव्या लागू शकतात. सीतापती म्हणाले की, अनेक कच्च्या मालाच्या किमती कच्च्या तेलाशी निगडित आहेत आणि त्या 3-4 आठवड्यांच्या विलंबाने बदलतात. सध्या ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल 80-85 डॉलरच्या दरम्यान असल्याने, कोणतीही मोठी अतिरिक्त दरवाढ आवश्यक असेल असे कंपनीला वाटत नाही.
हिंदुस्तान युनिलिव्हरकडून 5 टक्क्यांपर्यंत दरवाढ
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) सप्टेंबर तिमाहीत विविध उत्पादन श्रेणींमध्ये दरवाढ करण्याची शक्यता आहे. एप्रिल-जून तिमाहीच्या तुलनेत सप्टेंबर तिमाहीत महागाई 2 ते 5 टक्क्यांनी वाढू शकते. HUL च्या सीईओ आणि एमडी, प्रिया नायर यांनी सांगितले की, जून तिमाहीत 2 ते 5 टक्क्यांनी दरवाढ केल्यानंतर, विक्रीच्या प्रमाणावर आधारित वाढीवर परिणाम न करता वाढता खर्च भरून काढण्यासाठी कंपनी चालू तिमाहीत आवश्यकतेनुसार संतुलित दरवाढ लागू करेल.
डाबरदेखील आपली उत्पादने अधिक महाग करणार आहे. डाबर इंडियाने म्हटले आहे की, नजीकच्या भविष्यात कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती कायम राहण्याची शक्यता आहे. परिणामी, नफा टिकवून ठेवण्यासाठी कंपनी दरवाढीसोबतच उत्पादकता आणि खर्च-कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करेल.
