पुण्यात चाललंय काय? वडापाव घेताना राडा, एकाने गमावला प्राण; नेमकं घडलं काय?

पुण्यामध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. या विचित्र घटनेमध्ये वडापाव खरेदी करताना पाय लागल्याने गणेश पेठेत तरुणाची हत्या झाली आहे. ही घटना गणेश पेठेतील डुल्या मारुती चौकात घडली आहे. या प्रकरणामध्ये मृत्यू झालेला तरुण 28 वर्षांचा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवम परदेशी असं 28 वर्षीय हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी वैभव साळुंखे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडापाव घेताना एकमेकांच्या पायाला पाय लागला आणि त्यानंतर वैभवने शिवमच्या छातीवर बुक्क्या मारल्या. उपचारादरम्यान शिवमचा मृत्यू झाला. शिवम आणि वैभव दोघं गणेश पेठ परिसरात राहतात. दोघांची तोंड ओळख आहे.

अंतर्गत रक्तस्त्राव झाला

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत शिवम आणि आरोपी वैभव घटनेच्या दिवशी दोघेही डुल्या मारुती चौकातील एका वडापावच्या गाडीवर वडापाव खरेदी करण्यासाठी गेले होते. तेथे गर्दीत अनावधानाने वैभवच्या पायाला शिवमचा पाय लागला. या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद पेटला. वादाच्या भरात रागात असलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर जोरदार बुक्क्या मारल्या. या मारहाणीमुळे शिवमच्या शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव झाला. गंभीर दुखापत झालेल्या शिवमला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

दोघांचेही वडील रिक्षा चालवतात

आरोपी वैभव हा एका बिल्डरकडे अकाउंटंट म्हणून नोकरी करतो. आरोपीबरोबरच पीडितही सर्वसामान्य कुटुंबातील आहेत.  विशेष म्हणजे, मृत शिवम आणि आरोपी वैभव या दोघांचेही वडील रिक्षाचालक म्हणून काम करतात. क्षणभराच्या रागातून आणि किरकोळ कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे गणेश पेठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला असून या प्रकरणामागे पूर्ववैमनस्यामधून काही गोष्टी होत्या का याचाही विचार केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *