समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये पाच जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. वर्ध्याच्या विरुळ जवळ ही घटना घडली आहे. मयत वर्धा जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातानंतर समृद्धी महामार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गावर इथेनॉलच्या टँकरची नागपूरकडे जाणाऱ्या कारला मागून जोरदार धडक बसली त्यामुळं हा अपघात घडला आहे. ही धडक इतकी जोरदार होती की त्यामुळं कारने पेट घेतला. अवघ्या काही सेंकदातच संपूर्ण कारने पेट घेतला.
कारने पेट घेतल्यानंतर या जळत्या कारमध्येच पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत सर्वजण वर्धा जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. त्यानंतर मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू झाले आहे.
रांजणगाव एमआयडीसीत दुर्दैवी अपघात
रांजणगाव एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये माल भरल्यानंतर टेम्पोच्या मागील बाजूस पडदा बांधत असताना चालक टेम्पो आणि रॅम्प यांच्या दरम्यान अडकून गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने शिरूर येथील माणिकचंद धारिवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाचा पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.
