आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे घाट विभागात ठीक ठिकाणी भूस्खलन झाले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुविधा विस्कळीत झाली असून मध्य रेल्वेने 17 जुलै 2026 पर्यंत जवळपास 30 इंटरसिटी रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. तेव्हा या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून शनिवारपासून या मार्गावर दररोज 200 अतिरिक्त बस फेऱ्या चालविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
200 अतिरिक्त बस फेऱ्या चालवणार :
शनिवारपासून विशेष नियोजनाअंतर्गत ई – शिवनेरीच्या 312 नियोजित फेऱ्यांसह साध्या बसेसच्या 200 जादा फेऱ्या मुंबई – पुणे मार्गावर दररोज चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि अखंड पर्यायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या शिवाय, प्रवाशांची प्रत्यक्ष गर्दी लक्षात घेऊन संबंधित आगार आणि विभागांना आवश्यकतेनुसार आणखी जादा बसेस सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रवाशाला वाहतुकीच्या सोयी अभावी अडचण येऊ नये, यासाठी एसटी प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
कोणत्या रेल्वे गाड्या रद्द?
खालील महत्वाच्या रेल्वे गाड्यांसह 30 रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
12123/12124 डेक्कन क्वीन (Deccan Queen) – मुंबई CSMT ↔ पुणे
11007/11008 डेक्कन एक्स्प्रेस (Deccan Express) – मुंबई CSMT ↔ पुणे
12127/12128 मुंबई–पुणे इंटरसिटी सुपरफास्ट एक्स्प्रेस (Intercity Express) – मुंबई CSMT ↔ पुणे
12125/12126 प्रगती एक्स्प्रेस (Pragati Express) – मुंबई CSMT ↔ पुणे
22105/22106 इंद्रायणी एक्स्प्रेस (Indrayani Express) – मुंबई CSMT ↔ पुणे
11009/11010 सिंहगड एक्स्प्रेस (Sinhagad Express) – मुंबई CSMT ↔ पुणे
