रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांतील शाळा उद्या बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रायगड जिल्हा प्रशासनाने यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. अलिबाग, पनवेल उरण, श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि पोलादपूर या सात तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसंच अंगणवाड्याना उद्या 2 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
सुट्टी कशासाठी?
हवामान खात्याने जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा हाय अलर्ट दिला आहे. या काळात जिल्ह्यात अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.
रायगडमध्ये अतिृवष्टीची शक्यता
गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असून मुख्य रस्ते, गावांमधील सखल भाग आणि नदी-नाल्यांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, 2 जुलै ते 4 जुलै या कालावधीत हवामान खात्याने अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच नदी, ओढे आणि धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
पालघरमध्येही शाळांना सुट्टी जाहीर
हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी, आश्रमशाळा आणि आयटीआय संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मात्र कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात सहकार्य करावे, असे आदेशात नमूद आहे. शिवाय प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
राज्यातील पाच ठिकाणी रेड अलर्ट
जूनअखेरीस राजधानी मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. तसंच राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून शहराला पाच दिवसांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रेड अलर्ट
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, पुणे (घाट)
ऑरेंज अलर्ट
नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा
येलो अलर्ट
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद
सोलापूर, कोल्हापूर (काही भाग), सांगली इ.
