मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठा विषप्रयोग; मोहरममध्ये उंदीर मारण्याच्या गोळ्या, भायखळ्यात 30 हजार भाविकांना संपवण्याचा कट

मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठा विषप्रयोगाचा कट मुंबई पोलिसांनी उधळून लावला आहे. शुक्रवारी भायखळा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोहरमच्या मिरवणुकीत सामील झालेल्या भाविकांना उंदीर मारण्याच्या विषाच्या (झिंक फॉस्फेट) गोळ्या वाटण्यात येत होत्या. हा प्रकार वेळीच लक्षात आल्यावर पेनकिलरच्या नावाखाली विषाच्या गोळ्या वाटणाऱ्या फैयाज प्रेमजी याला ताब्यात घेतले.

३० हजार रिकाम्या कॅप्सुल

पोलिसांनी त्याच्याकडून १४ हजार ९०० कॅप्सूल जप्त केल्या. भाविकांना विषाच्या गोळ्या देण्यामागे फैयाज याचा नेमका कोणता उद्देश होता याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. भायखळा येथील मिरवणुकीत हजारोंच्या गर्दींमध्ये एक तरुण कॅप्सूल वाटत होता. मिरवणुकीत जखमा करून घेणाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून हर्बल पेन किलर गोळ्या असल्याचे तो सांगत होता. याचदरम्यान सलमान सय्यद याला उलट्या होऊ लागल्याने पोलिसांना संशय आला आणि त्यांनी फैयाज याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या कॅप्सूलची तपासणी केली. दरम्यान, फैयाज याने ५० किलो झिंक फॉस्फेस्टची पावडर आणि ३० हजार रिकाम्या कॅप्सुलची ऑनलाइन ऑर्डर दिली होती.

पोलिसांची गर्दीमध्ये स्पीकरवरुन घोषणा

गर्दीत वाटल्या जाणाऱ्या गोळ्या विषारी असल्याचे समजल्यावर पोलिसांनी गर्दीमध्ये जाऊन स्पीकरवर घोषणा केली. यामुळे फैयाज याने वाटलेल्या कॅप्सूल अनेकांनी घेण्याचे टाळले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनेकांचे प्राण वाचले. पुण्यातील विमाननगर परिसरात राहणारा फैयाज प्रेमजी हा १५ दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. डोंगरी येथील एका हॉटेलमध्ये तो वास्तव्यास होता, असे तपासातून समोर आले आहे. भाविकांवर विषप्रयोग करण्याचा कट त्याचा एकट्याचाच आहे की, अन्य कुणाचा यामध्ये सहभाग आहे याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घातपात की दहशतवादी कट?

पोलिसांनी अटक केलेल्या फैयाज याने इराण आणि इराकची वारी केल्याचे उघडकीस आलं आहे. उच्चशिक्षित असलेल्या फैयाजन केलेले हे कृत्य घातपात आहे की, दहशतवादी कट या तपास पोलिस करीत आहेत. कुणाकडून प्रेरित होऊन त्याने हे पाऊल उचलले का, याबाबतही चौकशी केली जात आहे. यासाठी त्याचा मोबाइल, आर्थिक व्यवहार याची बारकाईने तपासणी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *