देशात जुलै महिन्यात मासिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने मंगळवारी आपल्या मासिक अंदाजात वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या जुलै महिन्यात दीर्घकालीन सरासरीच्या ९४ टक्के इतकाच पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. देशात जुलै महिन्यासाठीचा दीर्घकालीन सरासरी पाऊस हा सुमारे २८०.४ मिलीमीटर इतका गृहित धरला जातो.
देशातील काही भागांना मात्र या तुटीतून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. वायव्य आणि ईशान्य भारत, पूर्व-मध्य भारत; तसेच पूर्व द्वीपकल्पीय प्रदेशातील काही ठरावीक भागांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी एका निवेदनात सांगितले, की जुलै महिन्यात देशातील बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, देशातील वायव्य आणि ईशान्य भारत, पूर्व-मध्य भारत आणि पूर्व द्वीपकल्पीय क्षेत्रातील काही भाग या ठिकाणी पाऊस सामान्य किंवा सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. दीर्घकालीन सरासरी म्हणजे, एखाद्या विशिष्ट प्रदेशात ठरावीक कालावधीत नोंदवलेल्या पावसाची आकडेवारी असते.
