मुंबईच्या चेंबूर येथून मोठी बातमी समोर येत आहे. चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना ही चेंबूरमधील 11 नंबर रोडवर घडली आहे. घटना घडली तेव्हा बसमध्ये शाळकरी मुले होती. या दुर्घटनेत 10 शाळकरी मुले गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेनंतर मुलांचे रेस्क्यू करुन गाडीतून बाहेर काढण्यात आलं. पण तरीही एक मुलगा गाडीतच अडकल्याची माहिती आहे. त्याला गाडीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न शर्थीने सुरु आहेत. पण भलंमोठं वृक्ष बसवर कोसळल्याने बसची अवस्थादेखील वाईट झाली आहे. बसचं वरचं छत खालच्या दिशेला दबलं गेल्याने या मुलाच्या बचावकार्यात अडथला येत असल्याची माहिती मिळत आहे. सध्या बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.
एका विद्यार्थिनीचा मृत्यू
प्राथमिक माहितीनुसार, या बसमध्ये एकूण 13 शाळकरी मुलं होती. एका नामांकीत शाळेची ही बस होती. बस चेंबूरच्या 11 नंबर रोडवरुन जात असताना अचानक भलं मोठं झाड हे या बसवर उन्मळून पडले. या घटनेत बसमधील 10 शाळकरी मुले गंभीर जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. सर्व जखमी मुलांना जवळील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तर एक मुलगा हा बसमध्ये अडकला आहे. या मुलाला बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून बचावकार्य
घटनेनंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी मोठ्या संख्येने दाखल झाले. पोलिसांना या घटनेची तातडीने माहिती देण्यात आली. परिसरातील नागरिकांनी शक्य होईल तशी मदतीला सुरुवात केली. यानंतर अग्निशमक दलाचे कर्मचारी, महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सर्वांकडून मुलांना बाहेर काढण्याचं काम आधी करण्यात आलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांकडून प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी आता कुणावर कारवाई होते? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

