ठाण्यात फेरीवाल्यांनी पदपथ आणि रस्ते व्यापले आहेत. या समस्येमुळे सर्वसामान्यांना चालण्यासाठीही जागा शिल्लक नसल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या टीकेचा धनी झालेल्या वादग्रस्त अतिक्रमण विभागाबाबतच्या तक्रारीनंतर येथील कर्मचाऱ्यांच्या ‘होलसेल’ बदल्या करण्याचा निर्णय पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी घेतला. एकूण 116 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले. बदली झालेल्या ठिकाणी कर्मचारी हजर न झाल्यास तात्काळ शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
ठाण्यात प्रभाग स्तरावरील अतिक्रमणे, फेरीवाले, हातगाडीधारक तसेच अनधिकृत व्यवसायांवर होणारी कारवाई अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सातत्यपूर्ण व्हावी, यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रभाग समिती स्तरावरील अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागात कार्यरत 116 कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले.
अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश का?
शहरातील विविध अतिक्रमणांविरोधात कठोर आणि नियमित कारवाई करण्याची मागणी नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटनांकडून सातत्याने केली जात होती. या मुद्द्यावरून गेल्या आठवड्यात महासभेतही सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर आरोप केले. यावेळी अनेक कर्मचारी दीर्घकाळ एकाच प्रभागात कार्यरत असल्याने अतिक्रमणविरोधी मोहिमांमध्ये अपेक्षित सातत्य आणि परिणामकारकता दिसून येत नसल्याबाबतही वारंवार सूचना प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.
‘या’ पदांवरील कर्मचाऱ्यांची बदली
या आदेशानुसार नऊ प्रभाग समित्यांमधील अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ लिपिक, लिपिक, शिपाई, बिगारी आणि सफाई कर्मचारी अशा विविध पदांवरील एकूण 116 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
तोडक कारवाईची प्रतीक्षा
बदल्या केल्यानंतरही या विभागात नव्याने रुजू होणारे कर्मचारी तात्काळ पुन्हा एकदा स्थानिक पातळीवरील फेरीवाला आणि भू माफियांशी संगनमत करून अतिक्रमणांवर थातूरमातूर कारवाई करतात, असा आरोप वारंवार होतो. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन अधिनकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांवर प्रत्यक्षात कठोर कारवाई केव्हा करणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
महासभेतही अतिक्रमण कर्मचाऱ्यांवरून फैरी
ठाण्यातील नौपाडा परिसरात राम मारुती रस्त्यावर काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांच्या कारवाईदरम्यान गोंधळ झाला होता. स्थानिक भाजप नगरसेवक सुनेश जोशी आणि मृणाल पेंडसे यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यासाठी आलेल्या पालिका पथकाला विरोध करण्यात आला. या मुद्द्यावरून पालिकेच्या महासभेत जोशी यांनी प्रशासन स्थानिक हफ्ते वसुली करणाऱ्या माफियांचा उल्लेख करत पुरावे सादर केले. तसेच या फेरीवाल्यांना कारवाईबाबत आधीच माहिती मिळते. स्थानिक अधिकारी आणि यंत्रणा प्रचंड कुचकामी असल्याचे नगरसेविका पेंडसे यांनीही नमूद केले.
प्रशासनाने दिले होते कारवाईचे आदेश
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पादचाऱ्यांना चालण्यासाठीही जागा नसल्याचे स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनी सांगितले. शिवसेनेच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी शहराबाहेरून फेरीवाले याठिकाणी येऊन व्यवसाय करतात, असा आरोप केला. त्यांच्याकडून पावतीच्या माध्यमातून पैसे गोळा होतात. त्याचा कोणताही हिशोब नसतो, असेही शिंदे यांनी सांगितले. याबाबत पालिका प्रशासनाकडून बाजू मांडताना उपायुक्त गजानन गोदापुरे यांनी दोषींवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले होते.

