पाच टप्प्यांमध्ये होणा-या बिहार विधानसभा निवडणुकीत तिस-या आणि महत्वाच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. तिस-या टप्प्यात एकूण ५० जागा असून, सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.
पाटना, वैशाली, सारन, नालंदा, बक्सर आणि भोजपूर या सहा जिल्ह्यांमध्ये मतदान सुरु आहे. एकूण १४,१७० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव दहा मतदारसंघात दुपारी चार तर, उर्वरित ४० मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजता मतदानाची वेळ संपणार आहे.
तिस-या टप्प्यात एकूण १ कोटी ४५ लाख ९३ हजार ९८० नागरीकांकडे मतदानाचा अधिकार आहे. त्यात ७८ लाख ५१ हजार ५९३ पुरुष तर, ६७ लाख ६ हजार ६८७ महिला मतदार आहेत.
एकूण ८०८ उमेदवार रिंगणात असून, त्यात ७१ महिला उमेदवार आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची दोन मुले तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव अनुक्रमे महुआ आणि राघोपूर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत.
