मध्यपूर्वेतील युद्धाला विराम लावत अमेरिका आणि इराणने शांतता करारावर स्वाक्षरी केली. यासोबत 60 दिवसांची वाटाघाटीही सुरू झाली, ज्याबाबत आता दोन्ही पक्षांची विधाने समोर येऊ लागली आहेत. अमेरिका आणि इस्रायलसोबत संघर्षात होर्मुझची सामुद्रधुनी इराणची सर्वात मोठी ‘ढाल’ बनली होती आणि आता तेहरान या जलमार्गावरील आपले वर्चस्व सोडायला तयार नाही, जे पुन्हा एकदा त्यांच्या विधानातून स्पष्ट झाले आहे.
होर्मुझबाबत इराणची मोठी घोषणा
अमेरिकेसोबत वाटाघाटींदरम्यान इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझबद्दल एक मोठी घोषणा केली आहे. जागतिक व्यापारासाठी महत्त्वाच्या अशा या मार्गावर घडणाऱ्या कोणत्याही घटनांचे त्वरित निराकरण करण्यासाठी एक केंद्र आणि ‘टेलिफोन हॉटलाइन’ सुरू करण्याची तेहरानचे सर्वोच्च वाटाघाटीकार मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी घोषणा केली.
ही व्यवस्था 30 दिवसांच्या कालावधीसाठी लागू राहील, असे त्यांनी पुढे सांगितले. तसेच अमेरिकेने गोठवलेला 12 अब्ज डॉलर्सचा इराणचा निधी मुक्त करण्याच्या प्रक्रियेवर स्वाक्षरी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणी कायदे आणि तेथील प्रस्थापित प्रणालीनुसारच कारभार चालवला जाईल, हेही गालिबाफ यांनी स्पष्ट केले.
होर्मुझ सामुद्रधुनीसाठी बनणार हॉटलाईन
होर्मुझ सामुद्रधुनीतील कोणत्याही घटना त्वरित सोडवण्यासाठी एक केंद्र आणि टेलिफोन हॉटलाइन उभारली जाईल, जी 30 दिवसांच्या कालावधीत उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्या त्वरित सोडवेल, असे स्वित्झर्लंडमधील वाटाघाटींनंतर सोमवारी परतताना इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांशी बोलताना, इराणचे मुख्य वार्ताकार मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी सांगितले. या निर्णयामुळे तेल निर्यातीवर अवलंबून असलेल्या प्रादेशिक अर्थव्यवस्थेला मदत होऊ शकते, असे गालिबाफ म्हणाले.
इराणी संसदेचे अध्यक्ष गालिबाफ यांनी सांगितले की, होर्मुझ सामुद्रधुनी आता ‘इराणच्या व्यवस्थापनाखाली’ चालवली जाईल आणि ‘युद्धापूर्वीच्या स्थितीत कधीही परतणार नाही.’ तसेच इराण ‘आंतरराष्ट्रीय कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करेल’ असेही त्यांनी पुढे नमूद केले आणि या जलमार्गावर उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्वरित पावले उचलेल.
