कोकण रेल्वे देणार बोगदे उभारण्याचे धडे

कोकण रेल्वे देणार बोगदे उभारण्याचे धडे

अभियांत्रिकी चमत्कार अशी ओळख असलेले कोकण रेल्वे प्रशासन आता बोगदे बनवण्याचे धडे देणार आहे. सध्या देशात बोगदे बनवण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने युरोपातील देशांची मदत घ्यावी लागते.

त्यामुळे येत्या काळात देशातच हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कोकण रेल्वेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार कोकण रेल्वेच्या उभारणीत सिंहाचा वाटा असलेल्या जॉर्ज फर्नाडिस यांच्या नावाने गोवा येथे हे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.

येत्या २३ ऑक्टोबर रोजी या प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. कोकण रेल्वेच्या उभारणीत जॉर्ज फर्नाडिस यांचा सिंहाचा वाटा असल्याने त्यांना ही मानवंदना असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने सांगितले. तसेच कोकण रेल्वे उभारण्यात मधु दंडवते आणि आर. के. हेगडे यांचे योगदानही महत्त्वाचे असल्याचा उल्लेख रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात
केला होता.

देशभरात जवळपास १५०० किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम कोकण रेल्वे कॉर्पोरेशनमार्फत करण्यात आले आहे. मात्र, प्रत्येक वेळी हे तंत्रज्ञान देशात विकसित नसल्याने युरोपीय देशांची मदत घ्यावी लागली. यामध्ये मोठी रक्कम मोजावी लागली. मात्र, येत्या काळात हे तंत्रज्ञान देशात विकसित केल्यास त्याचा मोठा आर्थिक फायदा होईल, असा दावा कोकण रेल्वेने केला आहे.

शिवाय, देशातील वाढत्या शहरीकरणाचा विचार करता रस्ते आणि रेल्वेची उभारणी करताना बोगदे उभारणे गरजेचे होणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेकडून बोगदे उभारण्याकरता देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा मोठा फायदा होणार असल्याचे कोकण रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *